Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Title Song : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका जवळपास १७ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गोकुलधाम सोसायटीमधील सगळे रहिवासी, दया-जेठलाल, टप्पू या सगळ्या पात्रांनी घराघरांत लोकप्रियता मिळवली आहे. ही मालिका सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. या मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा सर्वत्र विशेष लोकप्रिय आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या शीर्षक गीतामध्ये काही विशिष्ट संवाद आहेत, जे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. उदाहरणार्थ, ‘काम दिन-रात करवाती मेरी सास मुझे रोज सताती है’ हा डायलॉग गृहिणींमध्ये इतका लोकप्रिय आहे की, इन्स्टाग्रामवर याचा ऑडिओ कायम ट्रेंड होत असतो. प्रेक्षक या मालिकेतील विविध संवादांवर रिल्स व्हिडीओ बनवून शेअर करत असतात. पण, तुम्हाला माहितीये का? शीर्षक गीतामधील हे संवाद मालिकेतील कलाकारांनी म्हटलेले नाहीयेत. हे संवाद एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने डब केलेले संवाद आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चं शीर्षक गीत डब करणाऱ्या या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं नाव आहे मेघना एरंडे. अभिनयाबरोबर ती उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. डोरेमॉन, शिनचॅन, निंजा हातोडी अशा अनेक लोकप्रिय कार्टुन्सला तिने स्वत:चा आवाज दिला आहे. नुकत्याच ‘आरपार – वूमन की बात’मध्ये सहभागी होऊन तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या टायटल साँगमध्येही डबिंग केल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय ‘बाहुबली’ सिनेमातील ‘शिवगामी देवी’ या भूमिकेचं हिंदी डबिंग सुद्धा मेघनाने केलं आहे.
मेघना सांगते, “तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं जे शीर्षक गीत आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला टप्पू येतो. आणि म्हणतो, ‘प्रॉब्लेम है? अंदर Solution है’ मग, त्यानंतर पुढे या गाण्यात, दया भाभी आणि मिसेस हाथी बोलायला लागतात…’काम दिन-रात करवाती मेरी सास मुझे रोज सताती है’ मग सासू म्हणते, ‘ठिक से साफ कर’ असे त्या गाण्यातील एकूण पाच ते सहा आवाज आहेत जे सगळे मी डब केले आहेत.”
दरम्यान, याशिवाय ‘बाहुबली’ सिनेमाच्या दोन्ही भागांतील शिवगामीच्या भूमिकेला मेघनाने डब केलं आहे. अनेक नामांकित जाहिरातींसाठी सुद्धा मेघनाने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय ‘टाईमपास’ सिनेमात तिने साकारलेली भूमिका सुद्धा सर्वत्र विशेष गाजली होती.