Rupali Bhosle On Her Marriage : मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वतःच्या दमदार अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. ‘बड़ी दूर से आये है’ या हिंदी मालिकेतून तिनं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. त्यानंतर काही नाटक आणि मालिकांमधून अभिनय करीत तिनं प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली.
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे तर रूपाली खूपच लोकप्रिय झाली. या मालिकेतील तिच्या संजना या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आपल्या काम आणि भूमिकांबद्दल रुपाली अनेकदा व्यक्त होताना दिसते. अशातच तिनं नुकत्याच एका मुलाखतीत स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
‘राजश्री मराठी’शी साधलेल्या संवादात रुपालीनं मी रिलेशनशिपमध्ये असल्याचं आणि लग्न झाल्याचंही म्हटलं. या मुलाखतीत रुपालीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर देताना रूपाली म्हणाली, “हो… मी डेट करीत आहे… मी रिलेशनशिपमध्ये आहे”, असं म्हटलं.
त्यानंतर तिला ‘तू लग्न कधी आणि कोणाबरोबर करणार?’ असं विचारण्यात आलं. तेव्हा रूपालीनं “माझं लग्न झालंय. मी स्वत:शीच लग्न केलंय”,असं मजेशीर उत्तर दिलं. त्यानंतर रूपालीनं स्वत:च्या लग्नाबद्दल असं म्हटलं, “मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे. नक्कीच जायचं आहे, नाही असं नाही; पण जोपर्यंत संकेतचं (रुपालीचा भाऊ) सगळं मार्गी लागत नाही. त्याच्या दोनाचे चार होत नाहीत. तोपर्यंत मला त्या दिशेनं विचार करता येणार नाही.
त्यानंतर ती सांगते, “जसं मी त्याला आणि आई-बाबांना सांभाळत आहे. तशीच माझ्याव्यतिरिक्त कोणीतरी मुलगी त्याला सांभाळण्यासाठी आली, तर मी माझा विचार करायला मोकळी. नाही तर माझ्या डोक्यात सतत त्याचे विचार येत राहतील. त्यामुळे मी जिथे असेन ना ती माणसं आनंदात राहणार… ना मी आनंदात राहणार. त्यामुळे मी माझ्याबद्दलचा विचार हे सगळं झाल्यावरच करणार. जी कोणी व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल, त्याला माझं कुटुंबसुद्धा त्याची जबाबदारी असल्याचं वाटलं पाहिजे.”
पुढे रुपाली आई-बाबा आणि भावाबद्दल असं म्हणाली, “जोपर्यंत आई-बाबा आहेत तोपर्यंत तरी त्यांची जबाबदारी माझी आहे. उद्या संकेत म्हणाला की, आम्ही वेगळे राहतोय किंवा काय… तरी मला काहीच प्रॉब्लेम नसेल. त्यानं सुखार राहणं महत्त्वाचं आहे; मग तो आमच्याबरोबर राहो किंवा त्याचं त्याचं वेगळं राहो. जोपर्यंत ती घडी व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत माझा लग्नाचा विचार नाही आणि अजून वेळ आहे. माझं लग्नाचं वय झालेलं नाही.”
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेनंतर रुपाली त्याच वाहिनीवरील ‘लपंडाव’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती सरकार अशी भूमिका साकारणार आहे. तिच्या या भूमिकेची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.