Rutuja Bagwe on partner: ‘तू माझा सांगाती’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘माटी से बंधी डोर’, अशा मालिकांमुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे घराघराxत पोहोचली. अभिनेत्रीच्या अभिनयाचे वेळोवेळी कौचुक होताना दिसते. आता ती तिच्या एका वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे.
ऋतुजा बागवे काय म्हणाली?
अभिनेत्री ऋतुजा बागवेने नुकतीच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला जोडीदाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने आजच्या पिढी मताबद्दल, विचारांबद्दल, तिला कसा जोडीदार हवा आणि आतापर्यंत तिच्या आयुष्यात कोणी का नाही, यावर वक्तव्य केले.
ऋतुजाला विचारण्यात आले की जोडीदार हवा असं का वाटत नाही? याचं कारण काय असतं? यावर ऋतुजा म्हणाली, “कधी कधी काही लोकांना योग्य जोडीदार मिळत नाही. ती व्हाइब मॅच होत नाही. दोन स्वतंत्र चांगली माणसं जोडीदार म्हणून चांगली असतीलच असं नाही. काहीचं असं असतं की मला लग्नच करायचं नाही. त्यांना जबाबदारी नको असते किंवा ते त्यांच स्वातंत्र, स्वावलंबीपणा जे काही आहे, त्याचा आनंद घेत असतात. काही लोक करिअरमध्ये गुंतलेले असतात. अशी खूप वेगवेगळी कारणं आहेत.”
पुढे ऋतुजा असेही म्हणाली, “आमच्या काळातील मुली, त्यांना तडजोड करावी लागणं म्हणजे आपण कशाचातरी त्याग केला आहे, असं वाटतं. पण, कुठलंही नातं जपण्यासाठी, निभवून नेण्यासाठी काही ना काहीतरी थोडीफार तडजोड करावीच लागते. कधी अहंकार बाजूला ठेवावा लागतो, कधी आत्मसन्मान काही काळासाठी शिथिल करावा लागतो. आत्मसन्मान असावा आणि तो कायम असावाच. पण, तो योग्य ठिकाणी, योग्य जागी तो बोलून दाखवला गेला पाहिजे. “
अभिनेत्री म्हणाली, “काही लोकांना स्वातंत्र व स्वैराचार यातला फरत कळत नाही. त्यांना असं वाटतं की मी स्वत:च्या दुनियेत खूश आहे. मला कोणाची गरज नाही. गरजेसाठी जोडीदार तसाही नसावाच. पण, आपल्या आयुष्यात आपल्या हक्काचं कोणीतरी असावं म्हणून तो असावा. त्यामुळे आपण स्वावलंबी असलो तरी कोणीतरी आपल्या हक्काचं असावं, असं मला वाटतं. माझा जोडीदार नसण्याचं हे कारण आहे की मला ते गणित जुळत नाहीये. मला आवडणाऱ्या लोकांना मी आवडत नाही, ज्यांना मी आवडते ते मला अजिबातच आवडत नाहीत. जेव्हा गणित जुळेल, तेव्हा जोडीदार मिळेल, असे म्हणत ऋतुजाने तिचे मत सांगितले.