Lakshmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ ही महामालिका रोज रात्री एक तास प्रसारित केली जाते. या कौटुंबिक मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेतील भावना, सिद्धू, लक्ष्मी, श्रीनिवास, जान्हवी, वेंकी, वीणा ही सगळीच पात्र आता घराघरांत पोहोचली आहेत.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना लक्ष्मीचं वेगळं रुप पाहायला मिळत आहे. साध्याभोळ्या लक्ष्मीने मुलांना धडा शिकवण्यासाठी कडकलक्ष्मीचा अवतार घेतला आहे. तर, दुसरीकडे सिद्धूच्या घरी भावनाचा छळ सुरूच आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून भावनाला टोमणे ऐकून घ्यावे लागत आहेत. याशिवाय जान्हवीबद्दल सांगायचं झालं, तर जयंतचा विकृतपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जान्हवी घरी आणलेल्या सशाची प्रेमाने काळजी घेतेय ही गोष्ट सुद्धा जयंतला खटकट असते.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सुरू असलेल्या या कथानकाबद्दल एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे पर्णिका राऊत. यापूर्वी तिने ‘शिवा’ आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नुकताच ( १२ जुलै ) प्रसारित झालेला एपिसोड पाहून अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. पर्णिका लिहिते, “सशाला शोधायला आलेली Funny Rescue टीम? गरज नसताना सिगारेटचे स्मोकिंग सीन्स? जुन्या मालिकेमध्ये पण दाखवले नसतील अशा दर्जाचे सुनेला छळायचे सीन्स? अचानक झालेली लक्ष्मीची सौंदर्या इनामदार? काय चालूये झी मराठी?”
“आजचा लक्ष्मी निवास मालिकेचा एपिसोड इतका फालतू आणि खालच्या दर्जाचा…का? झी मराठी? का? यापुढे ‘झी मराठी’कडून प्रेक्षकांनी काय अपेक्षा ठेवावी?” असा संतप्त सवाल अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करत केला आहे. याशिवाय या पोस्टमध्ये तिने ‘झी मराठी’ला टॅग देखील केलं आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते. यामध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ला, दिव्या पुगावकर, मेघन जाधव या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.