Marathi Actress Instagram Post : एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात पुरस्कारांचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण या पुरस्कारांमुळेच कलाकारांना आणखी काम करण्याचा हुरूप येत असतो. कलाकारांना प्रेक्षकांकडून त्यांच्या कामाची पोचपावती सोशल मीडियाद्वारे मिळतच असते. मात्र तरीही पुरस्कार मिळणं हे कलाकारांसाठी महत्त्वाचं असतं आणि यासाठी कलाकार मेहनतही घेत असतात.
अर्थात पुरस्कार मिळावे म्हणून कोणताच कलाकार उत्तम काम करतो असं नाही. कलाकार हा त्याचं मनोरंजनाचं काम करत असतो. पुरस्कार हे त्याच्या कामाची दखल म्हणून दिले जातात. त्यात जर शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार मिळाला तर कलाकाराचा आनंद हा गगनात मावणारा नसतो. असाच आनंद झाला आहे अभिनेत्री शर्मिला शिंदेला.
शर्मिला शिंदेही नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या तिचं रंगभूमीवर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ हे नाटक सुरू असून याच नाटकातील भूमिकेसाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. शर्मिलाने पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टखालील कॅप्शनमध्ये शर्मिला असं म्हणते, “महाराष्ट्र शासनाने ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील अभिनयासाठी माझ्या गळ्यात हे जड रौप्य पदक घालून माझं वजन वाढवलं. खरं सांगायचं तर, मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलं नाही आणि यापुढे सुद्धा करणार नाही. पण मी खोटं बोलणार नाही हा पुरस्कार मला हवा होता; कारण शासकीय पुरस्कारांचा मानच तेवढा मोठा असतो.”
यापुढे शर्मिला म्हणते, “काही वर्षांपूर्वी ‘सफरचंद’ हे नाटक करत असताना माझा मित्र आमिर तडवळकर मला म्हणाला होता ‘तू बघच, तुला यावर्षी राज्य नाट्य पुरस्कार मिळणार’. मी अतिशय अविश्वासाने त्याच्याकडे बघत विचारलं होत, ‘हो? खरंच मला हा पुरस्कार मिळू शकतो?’ माझ्याबद्दल भयानक विश्वास दाखवत त्याने माझ्यासमोर एक-दोन वेळा हा पुरस्कार मिळालेल्या लोकांची नाव मोजली. त्यावर्षी हा पुरस्कार मला मिळाला नाही. पण यावर्षी ध्यानी मनी नसताना सुद्धा हा सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यात आला.”
शर्मिला शिंदे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर ती असं म्हणते, “या पुरस्काराचं वजन मला कितपत पेलवेल मला माहीत नाही. पण मी नक्की पूर्ण प्रयत्न करेन. माझ्या आजपर्यंतच्या ‘ज्याची त्याची लव स्टोरी’च्या प्रवासात माझ्या संपूर्ण टीमने मला केलेल्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
यानंतर तिने नाटकातील दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि इतर तंत्रज्ञ मंडळींचा उल्लेख केला आहे. दरम्यान, शर्मिलाने शेअर केलेल्या या पोस्टखाली मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिचं कौतुकही केलं आहे.