Sharmishtha Raut : शर्मिष्ठा राऊत तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेते. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेत्री लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून देखील जबाबादारी सांभाळताना दिसतेय. शर्मिष्ठाने नुकत्याच ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर भाष्य केलं आहे. शर्मिष्ठाचं पहिलं लग्न अमेय निपाणकरशी झालं होतं. शर्मिष्ठा आणि अमेय यांनी २०१८ मध्ये घटस्फोट घेतला. याबद्दल अभिनेत्री काय म्हणालीये जाणून घेऊयात…

शर्मिष्ठा सांगते, “त्या काळात आपलं आयुष्य आपल्याला बरंच काही शिकवून जातं. मी ‘बिग बॉस’मध्ये जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा मी हेच बोलले होते की, मी लग्नाचा निर्णय घेतला होता…तो माझा निर्णय होता आणि तो चुकला. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाही, आरोपही करणार नाही. जेव्हा न पटण्याची किंवा मतभेदाची सुरुवात होते तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचीच दिसत असते. या जगात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे मी इतकंच म्हणेन निर्णय माझा चुकला. माझे काही निर्णय चुकले तसे समोरच्या व्यक्तीचेही चुकले. दोन चांगली माणसं एकत्र आली म्हणजे सगळं चांगलंच होईल असं नसतं.”

आई-बाबांची खंबीर साथ मिळाली – शर्मिष्ठा राऊत

“माझ्या त्या कठीण काळात माझं कुटुंब कायम माझ्याबरोबर होतं. आज ऑन कॅमेरा सुद्धा मी सर्वांना विनंती करते, वैष्णवी हगवणेसारखी प्रकरणं समोर येतात…अशा बऱ्याच मुलींना घरी परत यायचं असतं. प्लीज त्यांना येऊद्या परत…माझ्या आई-वडिलांना मला खूप साथ दिली. माझ्या पालकांचं एकच म्हणणं होतं, राणी तू काहीच काळजी करू नकोस…तुझा निर्णय ठरलाय ना? आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू हो आलीये आमची मुलगी परत…माझ्या बाबांनी मला खूपच साथ दिली.”

“माझ्या इंडस्ट्रीतल्या मित्रमंडळींनी सुद्धा मला खूप साथ दिली. ललित प्रभाकर, मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या ताई, सीमा देशमुख, सुप्रिया पाठारे, हर्षदा खानविलकर, आशीष बेंडे असे खूप लोक आहेत सगळ्यांची मी नावंही घेऊ शकत नाही इतक्या लोकांनी मला या काळात मदत केली होती. मला कधीच या सगळ्यांमुळे एकटेपणा जाणवला नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आपल्याकडे घटस्फोट म्हटलं की सासूचा छळ, मारहाण होणं…हेच लोकांना वाटतं पण, असं नसतं. संबंधितांमध्ये तात्विक मतभेद सुद्धा असू शकतं. नातं जेव्हा संपतं…जेव्हा नात्याचं प्रेत झालेलं असतं, त्यात जीव उरलेला नसतो तेव्हा ते प्रेत जितके दिवस तुम्ही ठेवणार त्याला वासच येणार… मग तुम्ही कितीही अगरबत्त्या लावा किंवा गुलाबपाणी शिंपडा…त्यापेक्षा मग त्या नात्याला अग्नी द्यावा.”

“मी ‘बिग बॉस’च्या घरात होते तेव्हा एक निर्णय घेतला. तेव्हा रेशम ताई, मेघा, आऊ, सई या सगळ्यांनी सांगून-सांगून, माझं ब्रेन वॉश करून मला तो निर्णय घ्यायला लावला होता. तो निर्णय म्हणजे, की मी माझ्या आयुष्याला दुसरी संधी देईन.” असं शर्मिष्ठाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतचं दुसरं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२० मध्ये झालं. तिनं तेजस देसाईबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले आहेत.