मराठी कलाकार त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा लक्ष वेधून घेत असतात. त्यांचं घर कसं आहे त्यांचं राहणीमान कसं आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या शहरातील घराव्यतिरिक्त एखाद्या गावात जमीन घेऊन काही ना काही गुंतवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळी हिने कर्जतजवळ फार्म हाऊस बांधल्याचं सांगितलं. तर आता अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी नाशिकमध्ये फार्म हाऊस बांधल्याच सांगत त्याची झलक दाखवली आहे.
अभिनेत्री वर्षा दांदळे आतापर्यंत अनेक मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असतात. आता त्यांचं अनेक वर्षांपासूनचं एक स्वप्न पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या नाशिकजवळ बांधलेल्या फार्म हाऊसची झलक दाखवली. त्या म्हणाल्या, “मी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी या गावी आले आहे. तिथे आम्ही दहा गुंठे जागा विकत घेतली आहे आणि आमचं छोटसं घर बांधलं आहे. मी आणि माझे मिस्टर अधून मधून इथे येत असतो. इथे आम्ही आंब्याची झाडंही लावली आहेत. ती अजून छोटी आहेत. मजा येते अशा निसर्गरम्य वातावरणात राहायला. हे स्वप्न होतं माझं ते आता देवाच्या दयेने पूर्ण झालं आहे.”
त्यांचा हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे. त्यांचं हे घर नेटकऱ्यांना आवडलं असून या व्हिडिओवर कमेंट करत ते तसं सांगत आहेत. याचबरोबर या नवीन घरासाठी त्यांना शुभेच्छाही देत आहेत.