Sonalika Joshi On playing role of Madhavi Bhabhi for 17 years : अगदी कमी मालिका वर्षानुवर्षे सुरू राहतात आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशाच मालिकांपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आहे.
२००८ साली सुरू झालेली ही मालिका आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करते. विशेष म्हणजे आजही या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. टीआरपीच्या शर्यतीत तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेने इतर मालिकांना मागे टाकत अव्वल स्थान गाठतले आहे.
अनेक कलाकार असलेल्या या मालिकेचा संपूर्ण देशभरात चाहतावर्ग आहे. प्रत्येक पात्राचे वेगळे महत्त्व अन् ओळख आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक पात्राचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी दुसरे कलाकार मालिकेत दिसत आहेत. मात्र, काही कलाकार सुरुवातीपासून आजपर्यंत त्या मालिकेत दिसतायत.
दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी हे कलाकार त्यांपैकीच एक आहेत. आता मालिकेती माधवीभाभी ही भूमिका साकारणाऱ्या सोनालिका जोशी यांनी सतत १७ वर्षे एका मालिकेत काम करण्याबाबत वक्तव्य केले आहे.
“जर एखाद्या मालिकेतून हे सगळंच…”
सोनालिका जोशी यांनी ‘सुमन मराठी म्युझिक’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की १७ वर्षे तू त्या सेटवर जातेस, तुला कधी कंटाळा आला नाही का? यावर सोनालिका जोशी म्हणाल्या, “खरं सांगायचं तर कंटाळा येतो. पण, प्रत्येकाची एक प्राथमिकता असते. मुळात एका कलाकार म्हणून आपण काय बघतो तर प्रसिद्धी, चांगलं पात्र, लोकांना आपण साकारत असलेलं पात्र आवडावं असं वाटतं, ही मुळात अपेक्षा असते. मग त्यानंतर पैसा येतो. त्या यादीत पैसे हीसुद्धा प्राथमिकता आहे. मग जर एखाद्या मालिकेतून हे सगळंच एकाच ठिकाणी मिळत असेल, तर मग कंटाळा आला तरी ते करणं योग्य आहे.
“माणूस म्हणून असं वाटणं साहजिक आहे. मी असा कधीही विचार केला नव्हता की, मी ९-५ अशी नोकरी करेन. पण, सुदैवानं किंवा दुर्दैवानं मला तेच करावं लागत आहे. पण, मला जे एक कलाकार म्हणून हवंय ते समाधान मला तिथे मिळतंय. तर मग ठीक आहे.
“जोपर्यंत देवाची इच्छा आहे, तोपर्यंत…”
“मी जेव्हा जेव्हा हे ठरवायचे की बास आता मी मालिका सोडेन, तेव्हा तेव्हा मला इतके शक्तिशाली भटजी भेटले आहेत. मला इशारा मिळाला की, तू तिथेच थांब. कितीतरी वेळा मला देवाकडूनही इशारा मिळाला आहे की, तू तिथेच थांब, तिथेच काम कर. मालिका सोडू नको. तर आता जोपर्यंत देवाची इच्छा आहे, तोपर्यंत ते करत राहायचं. त्याला जेव्हा वाटेल की, आता बास झालं, त्यावेळी तो करेल. आता मी स्वत:ला समर्पित केलेलं आहे.”
पुढे सोनालिका जोशी म्हणाल्या, “सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, या मालिकेला जितकं लोकांचं प्रेम मिळालं आहे, तेवढं प्रेम कुठल्याच मालिकेला मिळालं नाही. हे प्रेम कोणीही विसरू शकत नाही. म्हणून मी असा विचार केला की, कदाचित मला लोकांचं अजून प्रेम मिळणार आहे.”
दरम्यान, मालिकेला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.