मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुप्रिया पाठारे यांना ओळखले जाते. सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत माई हे पात्र साकारत आहे. सुप्रिया पाठारे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे ठाण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. सुप्रिया पाठारे यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रिया पाठारे यांच्या आई कविता मालगुंडकर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुप्रिया पाठारे यांची बहीण अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”
त्याबरोबरच सुप्रिया यांनीही आईचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी ‘आई’ असे कॅप्शन देत आईबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहे. त्या पोस्टद्वारे त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान सुप्रिया पाठारे यांचं बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने अत्यंत कठीण परिस्थितीशी झगडून त्यांना लहानाचं मोठं केलं. सुप्रिया या घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आईबरोबर जाऊन अनेक घरची धुणीभांडीही करायच्या. तर कधी कधी शाळेत असताना त्यांनी रस्त्यावर जाऊन अंडी देखील विकली होती. आईच्या पाठिंब्यामुळेच पुढे त्या अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या होत्या.
आईच्या निधनानंतर सु्प्रिया पाठारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “आता कुठे आमच्या कुटुंबाला सुखाचे दिवस पाहायला मिळत होते. मात्र आता सुख आलं आणि डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं”, अशा शब्दात सुप्रिया पाठारे यांनी भावना व्यक्त केल्या. सुप्रिया पाठारे या ‘फु बाई फू’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘चि व चिसौका’, ‘मोलकरीण बाई’, ‘श्रीमंता घरची सून’ अशा विविध मालिका आणि चित्रपटात झळकल्या.