Marathi Actress Angry On Ghodbunder Road Condition : ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येने वाहनांची ये-जा होत असते. याच मार्गावरून मुंबई, पालघरसह गुजरातमध्ये जाणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरू असते. अत्यंत महत्त्वाच्या अशा या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते.
घोडबंदर रोडवरील या वाहतूक कोंडीचा त्रास केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर, कलाकार मंडळींनासुद्धा होत आहे. त्याबद्दल अनेक मराठी कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. त्यात दोन दिवसांपासून मराठी अभिनेता आस्ताद काळे या रोडच्या अवस्थेवरून प्रशासनावर टीका करताना दिसत आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने या रस्त्याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे
मराठी अभिनेत्री सुरभी भावेने घोडबंदर रोडवरील रस्ते आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसेच ती सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरही तिची मते स्पष्टपणे व्यक्त करताना दिसते.
इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरभी असं म्हणते, “दिवसाचा कोणताही प्रहर असो… घोडबंदर रोडवर कायमच इतके ट्रॅफिक का असते? आणि याबद्दल कुणालाच आस्था नसेल, तर मग प्रश्नच मिटला. मतदार गेले खड्ड्यात… जे रोजच जात आहेत. ठाणे ते मढ (मालाड), असा रोज प्रवास करताना सगळ्यांच्या कंबरेचा जो काय चक्काचूर होतोय, वेळ वाया जातोय आणि ज्या प्रवासासाठी एक तास लागायला हवा, त्यासाठी जर अडीच-अडीच तास जात असतील, तर ही खूप मोठी चिंतेची बाब असू शकते. पण काय करणार? बाकी कोणाला काही पडलेलीच नाहीय. आम्ही कलाकार फक्त व्हिडीओ बनवणार आणि त्याची बातमी होणार, यापलीकडे घडत काहीच नाही.”
यापुढे आणखी एक व्हिडीओ शेअर करत सुरभी म्हणते, “सर्व सन्माननीय मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक… या लोकांना मला विचारायचं आहे, तुम्ही कधी घोडबंदर रोडवरून गेला नाहीत का? गेला नसाल तर कृपया जा आणि शक्य असेल, तर तुमच्या मोठमोठ्या गाड्या बाजूला ठेवा. सामान्य नागरिक कसा प्रवास करतो, तसा प्रवास करा. मी बऱ्याचदा रिक्षाने प्रवास करते, आज म्हटलं आपल्या गाडीने जाऊ; पण सगळं चित्र तेच आहे. माझी विनंती आहे की, सन्माननीय लोकांनीसुद्धा या रस्त्यावरून प्रवास करावा. आओ कभी घोडबंदर रोड पे… मज्जा येईल… चंद्र लांब असला तरी तुमच्यामुळे आम्हाला चंद्रावर आल्याचा योग येतो.”
दरम्यान, सुरभी भावे टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील तिची नकारात्मक भूमिका आहे.