Navri Mile Hitlerla Fame Actress Dance Video : प्रियांका चोप्राला बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखलं जातात. तिचा अभिनय, दिलखेचक अदा, सुंदर आवाज या सगळ्या गोष्टी चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतात. आजच्या घडीला प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’ म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांपासून प्रियांका बॉलीवूडपासून दूर आहे. सध्या देसी गर्ल हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, प्रियांका सध्या बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली, तरीही अभिनेत्रीने तिच्या बॉलीवूड कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय प्रियांकावर चित्रित झालेली गाणी तिचे कमाल एक्स्प्रेशन्स आणि जबरदस्त डान्समुळे प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत. प्रियांका चोप्रा व हृतिक रोशन या दोघांनी २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘अग्निपथ’मधील “गुन गुन गुना रे…” या गाण्याची सर्वांना विशेष भुरळ पडली होती. प्रियांकाने सिनेमात या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं होतं.

आज जवळपास साडेतेरा वर्षे उलटून गेली तरीही “गुन गुन गुना रे…” गाण्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आताही हे गाणं सर्वत्र ट्रेंडिंग असतं. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मराठी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या दोघींनी नुकताच “गुन गुन गुना रे…” गाण्यावर सुंदर डान्स करत ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

वल्लरी आणि आलापिनी यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “हमारे खुशी का पिटारा” असं कॅप्शन वल्लरीने या पोस्टला दिलं आहे. याशिवाय कमेंट्समध्ये मराठी कलाकारांसह वल्लरीच्या चाहत्यांनी या दोघींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“किती छान…”, “मस्त डान्स करता तुम्ही दोघीही…खूपच छान डान्स व्हिडीओ शेअर केलाय तुम्ही… मस्त”, “याला म्हणतात खरा डान्स”, “किती भारीये”, “कमाल एक्स्प्रेशन्स”, “इतके परफेक्ट इमोशन्स सुंदर… शब्द नाहीयेत माझ्याकडे” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहे.

दरम्यान, वल्लरी व आलापिनी यांना ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. आता मालिका संपल्यावर वल्लरी आणि आलापिनी यांची जोडी रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.