Marathi Serial TRP Updates : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. टीआरपीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. कधी नव्या कलाकारांच्या एन्ट्री होतात, तर काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी काही रंजक ट्रॅक किंवा दोन मालिकांचा महासंगम घडवून आणला जातो.
नेहमीप्रमाणे टीआरपीच्या स्पर्धेत सायली-अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे. जुलै महिन्यात या मालिकेत कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळाला होता. ३० दिवसांत वात्सल्य आश्रमाचा निकाल कसा लागतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक होते आणि अपेक्षेप्रमाणे मालिकेच्या टीआरपीत अभूतपूर्व वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ५.९ रेटिंगसह ही मालिका पहिल्या स्थानी आहे. तर, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका ४.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आघाडीच्या मालिका
१. ठरलं तर मग
२. घरोघरी मातीच्या चुली
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी
४. थोडं तुझं आणि थोडं माझं
५. कोण होतीस तू काय झालीस तू
याउलट ‘झी मराठी’ वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या ‘कमळी’ मालिकेचं वर्चस्व तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही मालिका ‘झी मराठी’वर ३.९ रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता निखिल दामले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, ‘कमळी’ पाठोपाठ ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला चांगला टीआरपी मिळाला आहे. ही मालिका वाहिनीवर १ तास प्रसारित केली जाते.
‘झी मराठी’ वाहिनीवरील आघाडीच्या मालिका
- कमळी
- लक्ष्मी निवास ( ८ ते ८:३० )
- लक्ष्मी निवास ( ८:३० ते ९ )
- पारू
दरम्यान, ११ ऑगस्टपासून ‘झी मराठी’ वाहिनीवर तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनार यांच्या नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्यानंतर टीआरपीच्या आकडेवारीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तेजश्रीचं कमबॅक असल्याने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या दोन्ही मालिकांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.