घरोघरी गणेशोत्सवाची धामधूम अनुभवायला मिळत असताना, मालिकांमधून घरच्याच झालेल्या कुटुंबातही उत्सवाचा एकच जल्लोष सुरू आहे. मालिकांमधील कलाकार एकीकडे त्यांच्या घरच्या गणपतीचा उत्सव सांभाळत आहेत, तर दुसरीकडे सेटवरच्या गणेशोत्सवातही काही कमी पडू नये याची काळजी घेत दिवसरात्र चित्रीकरण करून प्रेक्षकांना हा आनंद अनुभवायला मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. या मालिकांमधील कलाकार आणि झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांना एकत्र आणणारा खास गणेशोत्सवानिमित्त आगळा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर कलर्स मराठी वाहिनीने सगळ्या नायिकांना एकत्र आणत खास गौराईचा आगळा जागर केला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर ‘कमळी’, शिवानी सोनारची मुख्य भूमिका असलेली ‘तारिणी’ आणि अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची ‘वीण दोघातली ही तुटेना’ या तीन नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. शिवाय, ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रमही नव्या कलाकारांसह सुरू झाला आहे. त्यामुळे या सगळ्या नव्या मालिकांमधील कलाकार आणि आधीच्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांना एकत्र आणत ‘उत्सव गणरायाचा’ हा विशेष कार्यक्रम झी मराठीवर रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता पाहायला मिळणार आहे.
‘गौराई माझी नवसाची’ हा वेगळा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’वरही पाहायला मिळणार आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘इंद्रायणी’ मालिकेची नायिका इंदू हिच्याबरोबर ‘कलर्स मराठी’वरील मालिकेतील सगळ्या नायिका ‘गौराई माझी नवसाची’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
‘इंद्रायणी’ मालिकेतील दिग्रसकरांच्या वाड्यात इंदूचा विवाहानंतर हा पहिलाच गणेशोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने गौराईचं घरी आगमन होणार आहे. यावेळी वाड्यात इंदू आपल्या सख्यांबरोबर अर्थातच भैरवी, तेजा, वल्लरी, प्रेरणा या नायिकांबरोबर गौराईच्या स्वागतासाठी पारंपरिक खेळ खेळताना दिसणार आहे. पारंपरिक गाणी, खेळ आणि गमतीजमतीबरोबरच सगळ्यांसाठी एकटीने शंभर मोदक बनवण्याचं आव्हानही इंदू कसं पूर्ण करणार? या सगळ्याचं चित्रण ‘गौराई माझी नवसाची’ या खास कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
‘झी मराठी’वरील ‘कमळी’ या नव्याकोऱ्या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत सगळ्यात पुढे धाव घेतली आहे. या मालिकेतील नायिका कमळी आणि संपूर्ण चमूने स्वत: गणपतीची सजावट केली आहे. तर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील जगताप कुटुंबातही गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. या मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिच्या घरी १५ दिवसांचा गणपती असतो. यावर्षी पहिल्यांदाच मालिकेतील गणेशोत्सव आणि घरचा गणपती यामुळे दोनदा गणेशाची सेवा करण्याचं भाग्य लाभल्याचा आनंद मृण्मयीने व्यक्त केला. असाच प्रकार ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धीराज गाडे पाटील ऊर्फ सिद्धूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता कुणाल शुक्लच्या बाबतीतही घडला. कुणालच्या नवीन घरी पहिल्यांदाच दीड दिवसाच्या गणेशाचं आगमन झालं होतं. आणि मालिकेतही गणेशोत्सवाची धामधूम होती. त्यामुळे एकीकडे सेटवरून घरच्या गणपतीची तयारी करणं आणि दुसरीकडे मालिकेतील गणेशोत्सवाचा आनंद एकाच वेळी अनुभवायला मिळाल्याचं त्याने सांगितलं. गणेशोत्सवात सगळ्या कलाकारांना सुट्टी मिळावी म्हणून दिवसरात्र चित्रीकरण पूर्ण केल्याचंही कुणालने सांगितलं.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेत सोसायटीच्या गणपतीची मूर्ती घडवण्याचं काम खुद्द अशोकमामांनी बाळगोपाळांना बरोबर घेऊन पूर्ण केलं. सतत येणाऱ्या संकटांना तोंड देता खचलेल्या अशोकमामांच्या मनाला उभारी मिळावी म्हणून भैरवी त्यांना आणि मुलांना गणपतीची मूर्ती घडवण्यासाठी प्रोत्साहन देते. गणेशाच्या आगमनामुळे तरी अशोकमामा पुन्हा त्याच धीराने आणि खंबीरपणे उभे राहतील का? हे या ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या खास गणेशोत्सव भागात पाहायला मिळणार आहे.