Milind Gawali Rejected 3 Roles After Aai Kuthe Kay karte : मिलिंद गवळी हे मराठीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठीसह त्यांनी हिंदीतही काम केलं आहे. आजवर त्यांनी नायकाच्या, खलनायकाच्या अशा बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. अशाताच आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये मराठी इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य केलं आहे.
मिलिंद गवळी लवकरच एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांची सकारात्मक भूमिका असलेली पाहायला मिळत आहे. यापूर्वी त्यांनी ‘आई कुठे काय करते’मध्ये अनिरुद्ध ही खलनायकाची भूमिका साकारली होती, त्यामुळे आगामी मालिकेतून ते एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. अशातच त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकवलं जातं याबाबत सांगितलं आहे.
मराठी इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाले मिलिंद गवळी?
मिलिंद गवळी यांनी ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठीमध्ये कलाकारांना साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकवलं जातं असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मराठीमध्ये सर्रास असं होतं. कॉमेडीयन आहे तर त्याला तशाच भूमिकांसाठी विचारणा होते. तो कितीही चांगला अभिनेता असला तरी वर्षानुवर्षे त्याला कॉमेडी करायला लावतात.”
मिलिंद गवळी यांनी पुढे अभिनेते भरत जाधव यांचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले, “आता कुठेतरी भरत जाधव गंभीर भूमिका करत आहे. अनेक वर्षे कॉमेडी केल्यानंतर गंभीर भूमिका असलेलं नाटक त्याने केलं. तशीच गंभीर भूमिका असलेला चित्रपट केला, जो छान झाला. इथे मेकर्स नाहीयेत, जे कलाकारांचा विचार करतील; त्यांनाच स्वत:चा विचार करावा लागतो. त्यामुळे काही वेळेला कलाकार चांगल्या भूमिका नाकारतात, कारण त्यांचं असं असतं की, नेहमी तेच करायचं कधीतरी काहीतरी वेगळं करायचं आहे, पण कोणी देत नाही.”
मिलिंद गवळी पुढे त्यांच्याबद्दल म्हणाले, “माझंपण तसंच झालं की, टेलिव्हिजनवर सगळ्या नकारात्मक भूमिका झाल्या होत्या. मग मी मराठी सिनेमांमध्ये नायकाची भूमिका साकारली. सकारात्मक भूमिका केल्या. नंतर पुन्हा टेलिव्हिजनवर परतलो तेव्हा एक सुंदर भूमिका केली, ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेत. ती गाजल्यानंतर मग ‘आई कुठे काय करते’ मिळाली.”
‘आई कुठे काय करते’ नंतर नाकारल्या ३ भूमिका
“यामध्ये अनिरुद्ध सुरुवातीला व्हिलन नव्हता, पण नंतर बदल होत गेले. त्या मालिकेत कोणालाही व्हिलन दाखवायचं नव्हतं. पण, कालांतराने ती मालिका पाच वर्षे चालली, त्यामुळे त्या पात्राचा प्रवास पुढे गेला आणि त्याला नकारात्मक करण्यात आलं. पण, सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका असल्याशिवाय ड्रामा होत नाही आणि टेलिव्हिजनला ते पाहिजे असतं, कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं असतं.”
मिलिंद गवळी पुढे अनिरुद्ध या भूमिकेबद्दल म्हणाले, “ही भूमिका पुढे नकारात्मक झाल्यानंतर माझं असं झालं की आता पुन्हा नकारात्मक भूमिका. पण, खूप प्रामाणिकपणे मी ते करत होतो. आता ‘आई कुठे काय करते’ नंतर मला तीन प्रॉजेक्टसाठी विचारणा झाली, पण तिन्ही भूमिका एकाच पठडीतल्या होत्या, पुन्हा नकारात्मक भूमिकांसाठी विचारणा झाली. सुदैवानं मी नाही म्हणू शकलो, कारण तितक्यातच मला ‘राजश्री प्रॉडक्शन’ने नवीन मालिकेत एक अतिशय सुंदर भूमिका दिली.