अभिनेते मिलिंद गवळी हे काही दिवसांपूर्वी ‘मनपसंद की शादी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात.
सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी लिहिले, “अनेक वर्ष बातम्या ऐकणं मी बंद केलं होतं.”
मिलिंद गवळी म्हणाले…
“घरी वर्तमानपत्र वाचले नव्हते, त्यामुळे जगामध्ये काय काय चालू आहे याचा मला गंधही नसायचा. तरीही मी मजेत जगत होतो. आपलं काम करायचं, एखादा छानसा सिनेमा बघायचा, एखादं पुस्तक वाचायचं, हीच दिनचर्या असायची. शूटिंगच्या सेटवर गप्पांमधून जे काही कानावर पडायचं तेवढ्याच बातम्या मला कळायच्या. “
“आयपीएल, अपघात, अनेक देशांच्या लढाया आणि लोकांचा आवडीचा विषय म्हणजे राजकीय घडामोडी. या कुठल्याच गोष्टींमध्ये रस नसल्यामुळे मी काही फार त्या बातम्यांच्या खोलात जायचो नाही. मस्त आनंदी जगायचो. आपण भले, आपलं घर भलं आणि आपलं काम भलं असं मी जगत होतो.”
“कितीही धो धो पाऊस जरी आला तरी मी सेटवर लवकरच पोहोचायचो. एक दीड तास आधीच निघायचो. अनेक लोकं प्रवासात अडकायचे, मला पावसाचा कधीही त्रास झाला नाही. उन्हाळ्यात अनेकांची लाहीलाही व्हायची, चिडचिड व्हायची, तसाही मला कमी घाम येतो, शूटिंगमुळे खूप ऊन सहन करायची सवय झालीये.”
“हिवाळा तर मस्त असतोच, पण मुंबईच्या हिवाळ्यामध्ये कधी स्वेटर घालावा लागत नाही. पण, मी स्टाईल म्हणून किंवा फॅशन म्हणून स्वेटर घालायचो. मला या सगळ्याचा त्रास होत नाही, पण माझ्या अशा वागण्याचा अनेकांना त्रास होतो. मला सगळे ऋतू आवडतात त्याला मी काय करू? पावसात पावसाची एक वेगळी मजा, हिवाळ्यात थंडीची मजा, खरंतर उन्हाळ्यातसुद्धा एक मजा असते. ती त्या माणसांना कळते, ज्यांच्या देशांमध्ये सात-आठ महिने बर्फच असतो. सूर्य त्यांना बघायलाच मिळत नाही. मग ते गोव्याच्या बीचवर उघडे झोपायला येतात.”
“आजकाल माझ्या वडिलांबरोबर बातम्या ऐकतोय, ते पोलिस खात्यात होते म्हणून त्यांना बातम्या ऐकायची सवय आहे. कदाचित म्हणून त्या त्यांना ऐकाव्या लागतात. पण, बातम्यांमध्ये इतकी नकारात्मकता असते की मला भीतीच वाटायला लागते. या वेळेच्या पावसाच्या बातम्या तर ऐकून मनाला धडकीच भरली.
“अनेक ठिकाणी पूर आले, घरं वाहून गेली, शेतीचं नुकसान झालं, ट्रेन बंद पडल्या, गाड्या वाहून गेल्या, मोनोरेल अचानक बंद पडली, दरवाजे उघडत नव्हते, चार-पाच तास लोक आतमध्ये गुदमरत होती. खिडक्या फोडून फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी लोकांना बाहेर काढलं.”
“सगळं किती भीतीदायक आहे. आपली शहरे किती नाजूक झाली आहेत. कदाचित भविष्यात काय होणार आहे याचे संकेत तर नाहीत ना? चीनमधील शिचेंग, इटलीमधील बाइआ(baiae), ग्रीसमधील पावलोपेट्री ही उदाहरणे आहेत. हवामान विज्ञानाचा अंदाज आहे की मुंबई, न्यूयॉर्क, जकार्ता आणि बँकॉकसारखी डझनभर प्रमुख आधुनिक शहरे भविष्यात अंशतः बुडून जाऊ शकतात”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.