‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा त्यांनी केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. तर आता एका मुलाखतीत ते दोघं त्यांचं नातं जाहीर करण्याच्या आधी चोरून भेटायचे तेव्हाचा गमतीशीर किस्सा त्यांनी सांगितला आहे.
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. गेली साडेतीन ते चार वर्षं ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल पुरेपूर गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अनेकांना ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज होता. गाण्याच्या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त अनेकदा ते एकत्र दिसले. तर एक-दोनदा ते चोरून भेटल्यामुळे असं काही घडलं की खरोखर त्यांना टेंशन आलं होतं. याचा एक गमतीशीर किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रथमेश म्हणाला, “मुग्धा जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हा आम्ही चोरून भेटायचो. ती कधीही लेक्चर चुकवून मला भेटायला आली नाही किंवा कधी मीही तसं तिला सांगितलं नाही. पण एखादं लेक्चर होणार नसेल तर साधारण अर्धा-पाऊण तास आधी कळतं. तसं ती मला आधी कळवायची आणि मी जर तेव्हा मुंबईत असेन तर मी तिच्या कॉलेजला जायचो, मग तिथून आम्ही दोघं माटुंगा सर्कलला जायचो. कारण मुग्धाच्या रुपारेल कॉलेजपासून ते जवळ होतं. तेव्हाही अनेकजण आम्हाला ओळखत होते. पण आम्ही एकत्र गाण्याचे अनेक एकत्र कार्यक्रम करत असल्याने त्या कारणाने भेटलो असं लोकांना वाटण्याची शक्यता असायची. पण आम्ही शक्यतो घरी सांगूनच एकमेकांना भेटायचो. त्यामागे आमचं भेटण्याचं काय कारण आहे हे आमच्या घरच्यांना माहीत नव्हतं.”
हेही वाचा : काय सांगता! स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या काय आहे दोघांच्यात नातं?
पुढे प्रथमेश म्हणाला, “अनेकदा लेक्चर ऑफ असेल तर ते ऐनवेळा कळायचं आणि तेव्हा घरी सांगणं शक्य व्हायचं नाही. मग तेव्हा आम्हाला खूप काळजी घ्यावी लागायची. एक- दोन वेळा आम्हाला हॉटेलमध्ये अलिबागमध्ये राहणारे काही ओळखीची लोकं भेटली. मग ते आता घरी तर नाही ना सांगणार असं एक वेगळं टेंशन होतं.” प्रथमेशने हा किस्सा सांगताच मुग्धा म्हणाली, “घरी सांगणार नाहीत ना हे टेंशन फक्त याचसाठी असायचं की लेक्चर होणार नाही हे अचानक कळल्याने आम्ही भेटतोय हे घरच्यांना सांगणं राहून जायचं.”