‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि ती एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा त्यांनी केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. आता तिने प्रथमेशला लग्नासाठी का होकार दिला हे सांगितलं आहे.
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांचं नातं सर्वांसमोर आणल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रथमेश व मुग्धाने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास प्रश्न उत्तरांचं सेशन आयोजित केलं होतं. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी मुग्धाने प्रथमेशमधील तिला आवडणारे गुण सांगित ती प्रथामेशच्या प्रेमात का पडली हे सांगितलं.
ती म्हणाली, “त्याचा स्वभाव खूप हेल्पिंग आहे. तो एखाद्या व्यक्तीला खूप मदत करतो. याचबरोबर तो खूप श्रद्धाळू आहे. तो कुठलीही गोष्ट अत्यंत मनापासून करतो. तो भरपूर काळजीही करतो. असे अनेक गुण जे साधारणपणे एखाद्या मुलामध्ये मुलीला हवे असतात ते सगळे प्रथमेशमध्ये होते. म्हणून मी प्रथमेशच्या प्रेमात पडले.”
आता मुग्धा आणि प्रथमेश लग्न कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अजून त्यांच्या लग्नाची तारीख ठरलेली नाही. तारीख ठरली की आम्ही तुम्हाला सांगू असं म्हणत त्यांनी त्यांच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.