चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. त्यामुळे आज संपूर्ण देशभरात रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जात आहे. घरोघरी लोक भक्तिभावाने प्रभू श्रीरामाची पूजा करत आहेत. आज रामनवमीच्या निमित्ताने गायिका मुग्धा वैशंपायन हिचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘राघवा रघुनंदना’, असं मुग्धा वैशंपायनच्या नव्या गाण्याचं नाव आहे. मुग्धाच्या युट्यूब चॅनलवर तिचं हे नवं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘राघवा रघुनंदना’ हे गाणं तिनं स्वतः गायलं असून संगीतबद्ध देखील केलं आहे.

हेही वाचा – ‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर

या गाण्याच्या शेवटी मुग्धा म्हणते, “रसिकहो नमस्कार. मुग्धा वैशंपायन ऑफिशअल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज याचं निमित्ताने तब्बल दोन-अडीच वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मी स्वतः संगीतबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं एक गाणं तुम्हा सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलीये. हे गाणं तुम्हाला कसं वाटतंय? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडलं असेल तर लाइक करा आणि जास्तीत जास्त शेअर केला.”

मुग्धाने सोशल मीडियावर या गाण्याच्या चित्रीकरणाचा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. मुग्धाने गुलाबी रंगाच्या सुंदर साडीमध्ये हे गाणं चित्रीत केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी रामनवमीच्या निमित्ताने मुग्धाचा पती प्रथमेश लघाटेचं ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे गाणं श्रोत्यांच्या भेटीस आलं होतं. या गाण्यासाठी प्रथमेशनं फक्त आवाज दिला नव्हता, तर तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन, मिक्सिंग, मास्टरींग, सिनेमॅटोग्राफी, व्हिडीओ ए़डिटिंग या सर्व जबाबदारी उत्तमरित्या पेलल्या होत्या. त्यामुळेच या गाण्याला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. युट्यूबवर या गाण्याला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. तर २२ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.