Munawar Faruqui Talks About Late Mother : ‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकी सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. त्यामध्ये तो अभिनेत्री सोनाली बेंद्रेसह सूत्रसंचालन करताना पाहायला मिळतो. मुनव्वर व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. अशातच त्यानं त्याच्या खासगी आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

मुनव्वरनं त्याच्या आईच्या झालेल्या दुर्दैवी निधनाबद्दल सांगितलं आहे. त्यानं प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. आईच्या निधानंतर त्याच्या नजरेत त्याच्या वडिलांबद्दल तिरस्कार निर्माण झाल्याचं त्यानं म्हटलं आहे.

मुनव्वर फारुकीने सांगितलं आईच्या निधनाचं धक्कादायक सत्य

आईबद्दल मुनव्वर म्हणाला, “कुटुंबातील कोणीही तिचं कधीच कौतुक केलं नाही. लग्नानंतर २२ वर्षं तिनं खूप काही भोगलं तरीसुद्धा ती संयमानं सगळं सहन करीत होती. परंतु, कधीतरी माणसाची सहन करण्याची ताकद संपते. मी १३ वर्षांचा होतो तेव्हा एक दिवस सकाळी मला सांगण्यात आलं की, आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मला समजलं की तिनं विष घेतलं होतं आणि माझे वडील हे सत्य सर्वांपासून लपवत होते. पण माझ्या आईच्या ओळखीची तिथे एक नर्स होती, तिनं आईला लगेन इमर्जन्सी रूममध्ये नेलं; परंतु तेथे तिचा मृत्यू झाला.”

मुनव्वर पुढे म्हणाला, “आईच्या निधनानंतर मला कुटुंबीयांनी लगेच कामाला लावलं आणि रडू नकोस तुला कुटुंबातील सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, असं सांगितलं. मी त्यावेळी कधी दु:खी असल्याचं मला आठवत नाही. कारण- मी स्वत:ला कशातही गुंतवून घ्यायचो आणि सगळं ठीक आहे, असंच वागायचो. मी घरात एकटा बसून रडायचो तेव्हा कुटंबातील कोणीही माझं सांत्वन करायला यायचं नाही. माझ्या आईशी कोण कसं वागलं हे मला अजूनही आठवतं; पण मी त्यांना माफ केलं आहे.”

आईच्या निधनानंतर मुनव्वर फारुकी वडिलांचा करायचा तिरस्कार

मुनव्वर वडिलांबद्दल म्हणाला, “मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या मनात त्यांच्यासाठी निर्माण झालेला तिरस्कार कमी होत नव्हता. सुरुवातीला मला त्यांचा खूप राग यायचा; पण जेव्हा मला कळलं की त्यांना या सगळ्याची जाणीव झाली आहे. तेव्हा माझा त्यांच्याबद्दलचा राग गेला. आईच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर माझ्या वडिलांना पॅरालिसीसचा अटॅक आला आणि त्यांचं ८० टक्के शरीर पॅरालाइज झालेलं. ११ वर्षे त्यांची परिस्थिती तशीच होती आणि मी त्यांना शत्रू समजायचो; पण शेवटी ते माझे वडील होते”.

वडिलांबद्दल पुढे तो म्हणाला “मी स्वत:ला सांगायचो की, त्यांनी चुकीचं केलं; पण त्यांना त्याची शिक्षाही मिळाली. तेसुद्धा सहन करत होते. त्यामुळे अशा माणसाचा मी काय तिरस्कार करणार. माझ्याशिवाय त्यांच्याकडे कोणीच नव्हतं. त्या परिस्थितीमुळे मी त्यांना माफ केलं आणि तेव्हापासून मला कशाचाही फरक पडत नाही.”