मालिकेत दिसणारी जोडपी ही प्रेक्षकांना जवळची वाटत असतात. मालिकेतील आवडत्या जोडप्यांमध्ये दुरावा आला, भांडण झाले, तर प्रेक्षकांनादेखील वाईट वाटते. त्यांना त्रास देणाऱ्या पात्रांचा ते तिरस्कार करतात. त्यांच्यातील दुरावा नाहीसा व्हावा, असे प्रेक्षकांनादेखील वाटत असते. आता अशाच एका मालिकेतील जोडपे अनेक संकटांवर मात करीत पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. हे जोडपे म्हणजे रमा-अक्षय हे होय. ‘मुरांबा’ (Muramba) मालिकेतील रमा-अक्षयच्या या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळते. आता ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने मुरांबा मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अक्षय रमाला एका खास ठिकाणी घेऊन आला आहे. जिथे सुंदररीत्या फुलांची सजावट केली आहे. रमाचे डोळे बंद करून, अक्षय तिला तिथे आणतो. जेव्हा तो तिच्या डोळ्यांवरचा हात काढतो तेव्हा रमा खूश झालेली दिसते. ती अक्षयकडे बघते. अक्षय तिला म्हणतो, “आता राजा-राणीचा संसार सुखाचा होईल.” तो काहीतरी आणण्यासाठी आत जातो. रमा टेबलवर ठेवलेला केक पाहते. हृदयाच्या आकाराच्या केकवर ‘आय लव्ह यू रमा’, असे लिहिलेले असते. त्याच्याशेजारीच गुलाबाची फुले ठेवलेली असतात. रमा ती फुले हातात घेते. त्याचा सुवास घेते. पण, त्याच वेळी तिच्या बोटाला गुलाबाचा काटा लागतो आणि रक्त यायला सुरुवात होते. रमा म्हणते, “सुख जेव्हा टिपेला जातं तेव्हा भीती वाटते. कारण- तिथून दु:खाची सुरुवात होते.” तिचे हे शब्द तिच्याकडे येत असलेला अक्षय ऐकतो. तो तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, “असं काहीही होणार नाही.”

‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “रमा-अक्षयच्या संसाराला कोणाची नजर ना लागो…”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “या दोन सुंदर गुलाबांना आता कोणताच काटा टोचला नाही पाहिजे. खूप खूप प्रेम रमा-अक्षय. ‘मुरांबा’मध्ये फक्त आता या दोघांच्या प्रेमाचा गोडवाच पाहिजे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “रमा-अक्षय सुंदर गोड जोडीचा संसार सुखाचा, आनंदाचा होऊ दे. ‘मुरांबा’ सीरियलमध्ये खूप खूप गोडवा येऊ दे.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “अक्षय बरोबर बोलतो आहे. आता राजा-राणीचा संसार सुखाचा होईल. फक्त राजा-राणी एकत्रच राहिले पाहिजेत. त्यांच्यात कुठलाच गैरसमज झाला नाही पाहिजे. विश्वास असला पाहिजे की, कुठल्याही गोष्टीवर मात करता येते.” एक नेटकरी म्हणतो, “रमा-अक्षय जोडी मस्त आहे.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, गेले अनेक दिवस रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षयने गेल्या दोन वर्षांतले काही आठवत नसल्याचे नाटक केले होते. त्यामुळे त्याला त्याची पत्नी रमापासून दूर राहावे लागले होते. अखेरीस रमाच्या मदतीने अक्षयने रेवाचे सत्य सर्वांसमोर आणले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता रमा-अक्षय अनेक दिवसांनी एकत्र आले असल्याचे पाहायला मिळत आहे. ते एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा: Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता ‘मुरांबा’ या मालिकेत काही वेगळे वळण येणार का, रमा-अक्षयमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता रमा-अक्षयच्या जोडीमध्ये प्रेम टिकणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.