Namrata Sambherao Dance Video : मराठी नाटक असो, सिनेमा असो किंवा टेलिव्हिजन…कोणत्याही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नम्रताला सर्वत्र ‘लॉली’ ही नवीन ओळख मिळाली. नम्रता यशस्वी अभिनेत्री आहेच पण, वैयक्तिक आयुष्यात तिने एक पत्नी, आई, मैत्रीण अशा सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळल्या आहेत.
प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा २९ ऑगस्टला वाढदिवस होता. नम्रताने तिचा यंदाचा वाढदिवस कुटुंबीय आणि हास्यजत्रेतील सहकलाकारांबरोबर साजरा केला. बर्थडे पार्टी एन्जॉय करत असताना नम्रताने आपल्या मित्रमंडळींसह अनेक बॉलीवूड गाण्यांवर डान्स केला. यापैकी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नम्रता हृतिक रोशनच्या “Senorita…” गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नम्रताने साडी नेसून ‘Senorita’ गाण्यावर सुंदर डान्स केला. यावेळी तिच्या मागे तिचे पती योगेश संभेराव व मुलगा रुद्राज हे दोघंही बसले होते. यावेळी चिमुकल्या रुद्राजने मोठ्या कौतुकाने आईचा डान्स करत असतानाचा व्हिडीओ काढला.
रुद्राज अवघ्या ६ वर्षांचा असूनही नेहमी आपल्या आईचं कौतुक करताना दिसतो. याआधी नम्रता शूटिंगमध्ये व्यग्र असताना रुद्राज व त्याच्या वडिलांनी नम्रताच्या वतीने तिचा पुरस्कार देखील स्वीकारला होता. आता आईला वाढदिवशी डान्स करताना पाहून रुद्राजने हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. वनिता खरातने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
दरम्यान, नम्रताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरांत लोकप्रिय झाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. याशिवाय नम्रताने ‘वाळवी’, ‘नाच गं घुमा’ अशा अनेक दमदार सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. नुकताच तिला ‘नाच गं घुमा’साठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.