Nashibvan Fame Neha Naik Talks About Addinath Kothare : गेल्या काही दिवसांमध्ये मराठी मालिकाविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता अजूनही काही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये ‘कोठारे व्हिजन’ची निर्मिती असलेल्या ‘नशीबवान’ मालिकेचाही समावेश आहे.
‘नशीबवान’ मालिकेत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री नेहा नाईक मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘नशीबवान’ या मालिकेतून निर्माता, दिग्दर्शक व लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. लवकरच येत्या १५ सप्टेंबरला ही मालिका सुरू होणार आहे.
या मालिकेत आदिनाथ आणि नेहा यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेते अजय पुरकर आणि इतर काही लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत. अशातच मालिकेच्या प्रमोशननिमित्त आदिनाथ, नेहा व मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी नुकतीच ‘राजश्री मराठीला’ मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत असलेल्या नेहानेही आदिनाथ बरोबर काम करण्याचा अनुभव मांडला आहे.
आदिनाथ कोठारेबद्दल नेहा नाईकची प्रतिक्रिया
मुलाखतीत आदिनाथबरोबर मालिकेत काम करायला मिळतंय याबद्दल काय सांगशील असं नेहाला विचारल्यानंतर ती म्हणाली, “हे सगळंच खूप स्वप्नवत आहे. आधी आम्ही एकत्र काम केले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात मी मुक्ताईची आणि त्याने नामदेवांची भूमिका साकारलेली; पण तो जॉनर खूप वेगळा होता. मला जेव्हा कळलं की, या मालिकेत आदिनाथ माझा सहकलाकार असणार आहे. तेव्हा मला धक्काच बसला. म्हटलं बापरे आता काय करायचं; पण खूप मजा येते काम करताना. प्रोमोपासून आमची एकत्र काम करायला सुरुवात झाली.”
नेहा नाईकने सांगितला आदिनाथ कोठारेबरोबर ‘नशीबवान’ मालिकेत काम करण्याचा अनुभव
नेहा पुढे म्हणाली, “तो इतकं सांभाळून घेतो की, कुठेही वाटत नाही की, तो खूप मोठा आहे किंवा तो असं दाखवतही नाही की, मी कोणी मोठा आहे, सीनियर आहे वगैरे. आमच्यात खूप चांगली मैत्री झाली आहे मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळतं. तो मला खूप गोष्टी सांगत असतो. सीनमध्येसुद्धा मी अजून काय करायला हवं याबद्दलही मला शिकवत असतो.”
आदिनाथबद्दल नेहा पुढे म्हणाली, “तो माझा चांगला मित्र झाला आहे. पहिल्या दिवशी मला जे दडपण होतं की, आता काय होणार, कसं होणार ते पहिल्याच सीनमध्ये त्याने घालवलं. तो म्हणाला, की कुठल्याही प्रकारची भीती मनात ठेवू नकोस आणि मनमोकळेपणाने सीन कर. तो मलाही खूप छान सीन करायला लावतो आणि स्वतःसुद्धा खूप छान सीन करतो. तो सीन करत असताना मला त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. हरवून जाते मी त्याला सीन करताना बघून.”