Adinath Kothare Talks About Father Mahesh Kothare : आदिनाथ कोठारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नुकतंच त्यानं मालिकाविश्वातही पदार्पण केलं. अशातच नवीन मालिकेच्या प्रमोशदरम्यान त्यानं त्याच्या वडिलांबद्दल म्हणजेच महेश कोठारे यांच्याबद्दल माहिती दिली आहे.

आदिनाथ सध्या त्याच्या ‘नशीबवान’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. नुकतीच सोमवारी (१५ सप्टेंबर) त्याची ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली. या मालिकेच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

आदिनाथ कोठारेची वडिलांबद्दल प्रतिक्रिया

आदिनाथला मुलाखतीत “जेव्हा तू ही मालिका करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुझ्या वडिलांची काय प्रतिक्रिय होती?” असं विचारण्यात आलेलं. त्यावर आदिनाथ म्हणाला, “आम्ही सगळे जण एकत्र बसून सगळे निर्णय घेतो. कुटुंबाबरोबर एकत्र बसूनच सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते. फक्त कामाच्या बाबतीतच नाही, तर आयुष्यातील इतर कुठल्याही गोष्टीत कुठलेही अडथळे आले, तर आई-वडील कायम माझ्याबरोबर असतात.”

आदिनाथ पुढे म्हणाला, “वडिलांबद्दल बोलायचं झालं, तर आम्ही फक्त वडील आणि मुलगा नसून मित्रांसारखे आहोत. त्यांनी हे नातं तसं ठेवलं आहे. आम्ही खूप भांडतो, आमच्यात खूप वादही होतात; पण आम्ही तितकीच मजाही करतो.”

आदिनाथ त्याच्या वडिलांबरोबर त्यांच्या ‘कोठारे व्हिजन’ या निर्मिती संस्थेची धुराही सांभाळतो. महत्त्वाची बाब म्हणजे याच संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नशीबवान’ या मलिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे.

आदिनाथला या मुलाखतीत त्यानं मालिकेत काम करण्यासाठी इतका वेळ का घेतला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणाला, “मी असं काही ठरवून करीत नाही. जशी चांगली कलाकृती येते, तसं त्यामध्ये मी काम करतो. माझ्याकडून एक गोष्ट राहिलेली ती मालिका होती आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक घरातील गृहिणींचं मन जिंकण्यासाठी नशीब लागतं आणि ते जर मला या मालिकेतील रुद्रप्रताप घोरपडे बनून करता आलं, तर मी स्वत:ला नशीबवान समजेल.”