Navri Mile Hitlerla Off Air : ‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या दोन मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या दोन्ही मालिकांची निर्मिती शर्मिष्ठा राऊतने केली होती. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. २५ मे रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित झाला. मालिकेच्या शेवटच्या दिवशी सेटवर सगळेच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सरस्वती जहागीरदार ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भूमिका पाटीलने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत सेटवरच्या शेवटच्या दिवसाची झलक सर्वांना दाखवली. यावेळी पॅकअप झाल्यावर सगळेजण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या मालिकेची मुख्य नायिका लीला म्हणजे वल्लरी विराजला अश्रू अनावर झाले होते.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या सेटवर शेवटच्या दिवशी लीलाचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात जहागीरदारांच्या सुना व इतर मंडळी उत्साहात सहभागी झाली होती. हे शूट पार पडल्यावर सगळ्या गोष्टी आवरून सेटवर शेवटचं पॅकअप करण्यात आलं. याची झलक प्रेक्षकांना भूमिजाच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. यावेळी मुख्य नायिका लीला मालिकेच्या सगळ्या फॅन पेजेसनी शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीज पाहत असते…यादरम्यान तिचं मन भरून येतं.
“सगळ्या फॅन पेजेसनी आपल्या मालिकेला निरोप देताना ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही’ हे गाणं इन्स्टा स्टोरीजला लावलंय…मी खूप इमोशनल होतेय” असं लीला या व्हिडीओमध्ये सरस्वती आणि लक्ष्मी यांना सांगत असते. यानंतर अचानक तिचे डोळे पाणावतात आणि वल्लरी सेटवर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सरस्वती आणि लक्ष्मीने तिला धीर देत “रडू नकोस, आपलं ठरलंय ना नाही रडायचं” असं सांगितलं.
दरम्यान, भूमिजाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आता आम्ही ११ वाजता काय करणार? कोणती मालिका बघणार”, “खूप लवकर संपली मालिका…”, “मिस यू एजे-लीला…एक वर्ष केव्हा झालं समजलं सुद्धा नाही”, “तुम्हा सर्वांना एकत्र काम करण्याची संधी लवकरात लवकर मिळो, हीच बाप्पाकडे प्रार्थना आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी भूमिजाच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.