टीव्हीवर दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनतात. मालिकेत येणाऱ्या सततच्या ट्विस्टमुळे आता पुढे काय होणार ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असते. काही मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) मालिका ही त्या मालिकांपैकी एक आहे. आता ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये एजे लीलाच्या बहिणीचे रेवतीचे रक्षण करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एजे करणार लीलाच्या बहिणीचे संरक्षण

‘झी मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, लीलाच्या वडिलांनी ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे, ती साळुंखे ही व्यक्ती त्यांना सतत त्रास देत आहे. तो म्हणतो की, माझे आताच्या आता १८ लाख टाका; नाही तर या मुलीचा हात माझ्या हातात द्या, असे म्हणून साळुंखे रेवतीचा हात धरतो आणि तिला ओढत नेत असतो. तेवढ्यात एजे येतो आणि रेवतीला वाचवतो. तो साळुंखेला म्हणतो की, परत जर रेवतीकडे वाकड्या नजरेने पाहिले ना, तर गाठ माझ्याशी आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

रेवतीची सुटका झाल्यानंतर ती एजेला म्हणते की, या वर्षीची राखीपौर्णिमा मला तुम्हाला ओवाळून साजरी करायची आहे. त्यानंतर ती एजेला ओवाळते आणि ओवाळणीत एजे तिला चेक देताना दिसत आहे. तेवढ्यात लीला येते. एजेने पैशांचा पुढे केलेला चेक पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि तिच्या मावशीआईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजेंनी रेवतीला ओवाळणीत दिलेले पैसे लीलाचा स्वाभिमान दुखावतील का?”, असे म्हटले आहे.

हेही वाचा: ठरलं तर मग : का रे दुरावा…; सायलीचं गाणं ऐकताच प्रतिमाला अश्रू अनावर, लेकीला मिठी मारून रडली, भावुक प्रोमो

आता पैशांमुळे एजे आणि लीलामध्ये पुन्हा गैरसमज निर्माण होणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे लीलाच्या वडिलांनी साळुंखेकडून मोठे कर्ज घेतले आहे; मात्र ते पैसे ते परत करू शकले नाहीत. त्यामुळे साळुंखे त्यांना सतत त्रास देत असतो. आता एजेने कानउघाडणी केल्यानंतर साळुंखे गप्प बसणार की आणखी कोणते नवे कटकारस्थान करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याबरोबरच लीला आणि एजेमध्ये काय समीकरणे तयार होणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे. आता एजे दिलेले पैसे रेवती स्वीकारणार का, लीला तिला ते पैसे घेऊ देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.