Navri Mile Hitlerla fame Aalapini Nisal shares incident: रस्त्यावरून जात असताना मुलींची छेडछाड होण्याच्या अनेक घटना घडतात. मुलींना पाहून मोठ मोठ्याने गाणी म्हणणे, विचित्र हावभाव करणे किंवा इतर अनेक गोष्टी होतात. बऱ्याचदा या घटना समोरही येत नाहीत, तर काही वेळा अनेकदा मुली अशा घटनांबद्दल त्या जाहिरपणे बोलतात. आता असाच एक प्रकार अभिनेत्रीबरोबर घडल्याचे समोर आले आहे.
आलापिनी निसळने सांगितला घडलेला प्रकार
अभिनेत्री आलापिनी निसळने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, “३ दुचाकी, ६ मुले, रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत होते आणि ते एकमेकांशी बोलत होते, मी त्यांना ओव्हरटेक केला.”
“ती मुले गाड्यांचे हॉर्न वाजवत होती. बघ की इकडे, ए पाव्हणी असे ते मोठमोठ्याने म्हणत होते आणि शिट्ट्या वाजवत होते. मी वळले तेव्हा ते अशा पद्धतीने पुढे गेले की जणू काही घडलेच नाही.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले, “मी घरी आले, बाप्पाशेजारी बसले. मला माहीत नाही मी तिथे किती वेळ बसले होते”, असे लिहित आलापिनीने घडलेली घटना सांगितली.
आलापिनी निसळ ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. तिने या मालिकेत रेवती ही भूमिका साकारली होती. लीलाच्या बहिणीची भूमिका तिने साकारली होती. बहिणी-बहिणीमधील प्रेम प्रेक्षकांना आवडले होते. त्यांच्यातील बाँडिंगमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती.
मालिका संपल्यानंतरही ती व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिच्या नृत्य सादरीकरणाच्या व्हिडीओंना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. वल्लरी विराजबरोबरचे डान्सचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.