Raqesh Bapat Divorce: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका एकापेक्षा एक कलाकार, कथा व सतत येणारे ट्विस्ट यामुळे लोकप्रिय आहे. या मालिकेतील एजे व लीला ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे.

एजे व लीला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते. त्यांची छोटी-मोठी भांडणे, एकमेकांवरचे प्रेम, त्यांची एकमेकांबद्दल असणारी ओढ, काळजी यांमुळे त्याचे सीन पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. दोघांच्या स्वभावात खूप मोठा फरक असला तरी ते एकत्र आल्यानंतर परिपूर्ण वाटतात. आता एजेची पहिली पत्नी अंतरा पुन्हा त्यांच्या आयुष्यात आली आहे.

अंतरा एजेची पहिली पत्नी आहे, जिच्यावर एजेचे खूप प्रेम होते. मात्र, एका अपघातानंतर अंतराचा मृत्यू झाला, असे एजेसह जहागीरदार कुटुंबाला वाटत होते. त्यामुळे एजेच्या आईने त्याचे दुसरे लग्न केले. लीला त्याच्या आयुष्यात आल्यानंतरही तो अंतराच्याच प्रेमात होता. मात्र, लीलाने तिच्या प्रामाणिकपणाने, प्रेमळ स्वभावाने एजेचे मन जिंकले आणि मग एजे तिच्या प्रेमात पडला. आता अंतराच्या येण्याने अनेक गोष्टी बदलत असल्याचे दिसत आहे. मात्र, मालिकेत दोन पत्नी असणाऱ्या एजेचा खऱ्या आयुष्यात मात्र घटस्फोट झाला आहे.

राकेश बापटने ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर बांधलेली लग्नगाठ

मालिकेतील एजे ही भूमिका अभिनेता राकेश बापटने साकारली आहे. अभिनेत्याने लोकप्रिय अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्नगाठ बांधली होती. रिद्धी डोगरा व राकेश बापट हे ‘मर्यादा : लेकिन कब तक?’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर ते प्रेमात पडले. २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. आठ वर्षांच्या संसारानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ ला त्यांनी घटस्फोट घेतला.

रिद्धी डोगरा ‘राधा कि बेटियाँ कुछ कर दिखायेंगी’, ‘माता-पिता के चरणों में स्वर्ग’, ‘लागी तुझसे लगन’, ‘मर्यादा : लेकिन कब तक?’, ‘वो अपना सा’, अशा मालिकांतून घराघरांत पोहोचली. तिने ‘असुर’, ‘मॅरिड वूमन’ अशा अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. रिद्धी डोगराने शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम केले आहे. ‘टायगर ३’, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्येदेखील अभिनेत्रीने काम केले आहे. सध्या बंदी घालण्यात आलेल्या अबीर गुलाल या चित्रपटात देखील ती महत्वाच्या भूमिकेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रिद्धी डोगरा व राकेश बापट आजही चांगले मित्र आहेत. रिद्धी डोगराने काही दिवसांपूर्वी याबद्दल वक्तव्य केले होते. तिने एका मुलाखतीत तो माझा एक्स असला तरी तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी आहे, असे म्हटले होते.