Raqesh Bapat shares video with Vallari Viraj: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिका आता संपली आहे. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेने वर्षभराहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत राकेश बापट व वल्लरी विराज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. अभिनेता राकेश बापटने अभिराम जहागिरदार ही भूमिका साकारली होती, तर वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारली होती. एकमेकांच्या अगदी विरुद्ध असलेले, वयात जास्त अंतर असलेल्या या जोडीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.
रागीट, कडक शिस्तीचा, जबाबदार आणि रुबाबदार असा एजे, तर गोंधळ घालणारी, अल्लडपणा असणारी, प्रेमळ आणि सुंदर लीला यांचे एकमेकांशी लग्न झाले. सुरुवातीला त्यांच्यात असलेल्या गैरसमजामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. मात्र, हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. त्यांनी एकत्र येत अनेक संकटावर मात केली. एकमेकांना प्रत्येकवेळी मदत केली, त्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती.
राकेश बापटने अभिनेत्री वल्लरी विराजबरोबर शेअर केला व्हिडीओ
आता अभिनेता राकेश बापटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या शेवटच्या दिवसाचा असल्याचे दिसत आहे. राकेश बापट हा एजेच्या पेहरावात आहे. तो लीलाच्या मेकअपरुममध्ये जातो, लीलाला म्हणतो की, शेवटचे एकदा सीन करूयात. लीला व एजे रूममधून बाहेर पडतात. व्हिडीओच्या शेवटी ते बाय असे म्हणताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना राकेश बापटने गाण्याच्या ओळी लिहित निरोप घेतोय असे लिहिले. “अच्छा चलते हैं, दुआओं में याद रखना. अभिला(अभिराम व लीला) निरोप घेत आहेत.” पुढे त्याने प्रेक्षकांच्या प्रचंड प्रेमाबद्दल आणि नवरी मिळे हिटलरला या मालिका तयार करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच नवरी मिळे हिटलरला आणि झी मराठी वाहिनीला टॅगदेखील केले आहे.
राकेश बापटच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भावूक कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. “पुन्हा तुम्ही एकत्र भेटायला या, आम्ही वाट बघू”, “आम्हाला तुमची आठवण येईल”, “मी आशा करत आहे की तुम्ही एका नवीन प्रोजेक्टमधून एकत्र भेटण्यासाठी याल”, “तुमची खूप आठवण येईल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
आता राकेश बापट, वल्लरी विराज आणि मालिकेतील इतर कलाकार कोणत्या भूमिकांतून आणि कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.