Navri Mile Hitlerla Fame Actress : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पासह आता घरोघरी गौरीचं आगमन देखील झालेलं आहे. मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी देखील मोठ्या दणक्यात यंदाचा गणेशोत्सव साजरा करत आहेत. रुपाली भोसले, अमित भानुशाली, जुई गडकरी, मृणाल दुसानिस, सिद्धार्थ चांदेकर अशा अनेक कलाकारांच्या बाप्पाची झलक चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार कोकणात पोहोचले आहेत. तर, काही कलाकारांच्या मुंबईतील घरी बाप्पा विराजमान होतात.
बाप्पाचं आगमन झाल्यावर घराघरांत प्रसन्न वातावरण असतं. खास गणपतीच्या सणाला मराठी मालिकाविश्वातील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी सोशल मीडियावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला आहे. यावेळी या दोघींनीही पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. या अभिनेत्रींची नावं आहेत वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ.
वल्लरी आणि आलापिनी यांचं ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका संपल्यावरही एकमेकींशी खूप सुंदर बॉण्डिंग आहे. या दोघीही जिवलग मैत्रिणी आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका संपल्यावर सध्या वल्लरी आणि आलापिनीचे डान्स व्हिडीओ सर्वत्र विशेष चर्चेत असतात. या दोघीजणी कधी बॉलीवूड, तर कधी मराठी गाण्यांवर सुंदर नृत्य सादरीकरण करून सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
गणेशोत्सवानिमित्त नुकताच वल्लरी आणि आलापिनी यांनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला आहे. या दोघी यावेळी ‘ए विघ्नहर्ता हे बाप्पा विघ्नहर्ता…’ या ‘बँजो’ सिनेमातील गाण्यावर थिरकल्या. यावेळी दोघींनीही सुंदर साड्या नेसून पारंपरिक लूक केला होता. मोकळे केस, गजरा, सुंदर साड्या या लूकमध्ये वल्लरी आणि आलापिनी दोघीही खूप सुंदर दिसत आहेत.
वल्लरीने या व्हिडीओला ‘बाप्पा मोरया’ असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “अप्रतिम डान्स”, “किती सुंदर डान्स केलात”, “कलेची देवता तुमच्यावर प्रसन्न आहे”, “आमच्या गोड गौराई आल्या…वल्लरी-आलापिनी खूप सुंदर” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.