Vallari Viraj and Aalapini Dance Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी या ही मालिका संपल्यानंतरही कायमच चर्चेत असल्याचे दिसते.
झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेने प्रेक्षकांचे जवळजवळ वर्षभर मनोरंजन केले. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र, मालिकेतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसते.
या मालिकेत वल्लरीने लीला ही भूमिका साकारली होती; तर आलापिनीने रेवती ही भूमिका साकारली होती. लीला व रेवती या एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, एकमेकांच्या संकटाच्या काळात खंबीरपणे साथ देणाऱ्या अशा होत्या. त्यामुळे बहिणींच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाल्याचे दिसले.
मालिका संपली तरी या दोन अभिनेत्रींचे नातेदेखील आजही तसेच असल्याचे दिसते. दोघींना जितकी अभिनयाची आवड आहे तितकीच डान्सचीही त्यांना आवड आहे. त्यामुळे विविध फॉर्ममधील डान्सचे व्हिडीओ घेऊन, त्या सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि हातांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव यांमुळे त्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतात. या सगळ्याबरोबरच त्यांचे गाण्याला साजेसे पोशाखही लक्षवेधी ठरतात.
साधेपणातून या अभिनेत्री प्रेक्षकांचे मनोरंजनही करतात आणि त्यांची मनेही जिंकतात. विशेष म्हणजे त्यांच्या या डान्सच्या व्हि़डीओची फक्त चाहत्यांनाच नाही, तर कलाकारांनाही भुरळ पडते. आता वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
वल्लरी विराज आणि आलापिनीचा सुंदर डान्स
लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘आजा पिया तोहे प्यार दूँ’ या गाण्यावर वल्लरी व आलापिनी यांनी डान्स केला आहे. एका ठिकाणी बसून हात आणि पायांची हालचाल करीत त्यांनी सुंदर डान्स केला आहे. नेहमीप्रमाणेच त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. त्याबरोबरच साडी, गळ्यात हार, कपाळावर टिकली आणि बांधलेले केस यांमुळे या दोन्ही अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत आहेत.
कलाकारांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया
आता त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. शीतल क्षीरसागर यांनी लिहिले, “अहाहा! तुम्ही प्रत्येक वेळी असं काही मॅजिक तयार करता, तेव्हा मी तुमच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडते. लव्ह यू माय गर्ल्स”. अभिनेत्री ऋतुजा बागवेने लिहिले, “दृष्ट काढा”. सीमा घोगळे यांनी लिहिले, “तुम्हाला बघत राहावंसं वाटतं”. तर, पूर्वा कौशिकने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.




नेटकरी काय म्हणाले?
कलाकरांसह चाहत्यांनीदेखील अनेक कमेंट्स करीत दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. “नजर नको लागायला”, “तुम्ही दोघी”, “किती सुंदर. उत्तम सादरीकरण”, “पाहतच राहावं इतकी सुंदरी जोडी आहे. हावभाव तर कमाल आहेत”, “दोन सुंदर मुली एकाच फ्रेममध्ये”, “तुमच्यासारखं अगदी गोड सादरीकरण” अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, आगामी काळात वल्लरी आणि आलापिनी कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.