Vallari Viraj And Aalapini Nisal: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज व आलापिनी या दोन अभिनेत्री घराघरांत पोहोचल्या. मालिकेदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली. आता मालिका संपल्यानंतरही त्या अनेकदा एकत्र असल्याचे पाहायला मिळते.
आता वल्लरी विराज आणि आलापिनीने नुकतीच ‘मनोरंजन मराठी विश्व’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मालिकेत एकत्र काम करण्याचा अनुभव, सेटवर घडलेले किस्से, त्यांची मैत्री कशी झाली, मालिका संपल्यानंतर त्यांनी त्यांची मैत्री कशी जपली, एकमेकींच्या आयुष्यात त्यांचे काय स्थान आहे, अशा अनेक बाबींवर गप्पा मारल्या.
वल्लरी विराज काय म्हणाली?
आलापिनीबरोबर झालेल्या मैत्रीबाबत वल्लरी विराज म्हणाली, “मालिकेच्या सेटवरच आम्ही भेटलो. व्यावसायिक पार्श्वभूमीमुळेच भेटलो. मालिकेत जेव्हा आपण प्रमुख भूमिकेत असतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटते की तुम्ही कोणाशी पटकन मैत्री करणार नाही. कोणी पटकन आपल्याशी मैत्री करायला येत नाही. कधीकधी गृहीतके असतात की, कोणाशी मैत्री करत नसेल, कारण ती प्रमुख भूमिकेत आहे. असं सगळं असताना कोणी माझ्याबद्दल काही बोललं असेल तरी आलापिनीने माझ्याकडे त्या पलीकडे पाहिले.
लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं, याचा तिने तिला माझ्याबद्दल काय वाटतं, यावर कधीही परिणाम करून घेतला नाही. तिने त्यापलीकडे जाऊन मी खरी कशी आहे यावर विश्वास ठेवला, म्हणूनच आम्ही इतक्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकलो. खरंतर ती माझ्यापेक्षा लहान आहे. सेटवर कोणालातरी जास्त महत्त्व मिळत असेल किंवा आम्ही बाहेर कुठेतरी गेल्यावर क्वचित प्रसंगी असं घडलं की चाहत्यांनी मला ओळखलं आणि तिला ओळखलं नाही, तर ती स्वत: लोकांना म्हणते की मी फोटो काढून देते. अशा वेळी इर्ष्या वाटणे हा माणसाचा स्वभाव गुण आहे. पण, ती अजिबात तशी नाही. हे करण्यासाठी खूप मोठं मन लागतं.
मला वाटत नाही की वयाच्या २१ व्या वर्षी माझ्यामध्ये इतका समजुतदारपणा होता, ती अशी आहे म्हणून सेटवर काम करणं मला खूप सोपं गेलं. कामामुळे किंवा इतरही गोष्टींमुळे माझी चिडचिड झाली तर ते ऐकून घेण्यासाठी कायम ती होती. ती मला कुठल्याच गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही. मी रात्री तिला २ वाजता जरी फोन केला, तरी दोन वाजतासुद्धा माझ्याशी बोलते, ऐकते. दुसऱ्या दिवशी शो असला तरी ती बोलते, ती कायमच माझ्यासाठी असते.”
आलापिनी वल्लरी विराजबद्दल म्हणाली…
आलापिनी वल्लरीबद्दल म्हणाली, “वल्लरी माझ्यापेक्षा मोठी आहे. तिने माझ्यापेक्षा जास्त गोष्टींचा अनुभव घेतला आहे. तिच्या आयुष्यात आधीच खूप लोकं आहेत, जे तिच्यावर खूप प्रेम करतात. मी जेव्हा तिला भेटले, तेव्हा तिच्या आयुष्यात तिचे मित्र-मैत्रीणी होते. पण, त्यानंतरसुद्धा मला कधीही वाटलं नाही की मी तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग नाहीये. प्रत्येकवेळी जेव्हा मला तिची मदत पाहिजे असेल तर ते तिला न सांगता कळतं.
मालिकेत काम करत असताना मी जेव्हा जुनं घर सोडणार होते, तेव्हा वल्लरीने ती जिथे राहत होती, तिथे मला राहण्यास येऊ शकते असं ती म्हणाली होती. तिला एकटीला राहायला आवडतं, पण तरीही तिने मला राहण्यासाठी बोलावलं. तिच्याबरोबर असणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे”, असे म्हणत आलापिनीने तिच्या भावना व्यक्त केल्या.