Navri Mile Hitlerla fame Actress Shares Emotional Post:  ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेचा आज शेवटचा भाग प्रदर्शित झाला. या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कलाकारांसह अनेक चाहतेदेखील भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज व अभिनेता राकेश बापट प्रमुख भूमिकेत दिसले होते. वल्लरीने लीला व राकेशने अभिराम जहागिरदार उर्फ एजे ही भूमिका साकारली. या भूमिकांतून हे कलाकार घराघरांत पोहोचले. वल्लरी व राकेश यांच्याबरोबरच अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

“मी कायम नवरी मिळे हिटलरला मालिकेची कृतज्ञ असेन”

आता मालिकेत लीलाच्या बहिणीची म्हणजेच रेवतीची भूमिका साकारलेली अभिनेत्री आलापिनीने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर मालिकेविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आलापिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये काही पडद्यावरील तर काही पडद्यामागील फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये वल्लरी, शर्मिला शिंदे, रुचिर, भूमिजा पाटील, सानिका काशिकर, राकेश बापट असे अनेक कलाकार दिसत आहेत. तसेच सर्व कलाकारांमधील बॉण्डिंगदेखील लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना आलापिनीने कॅप्शन दिली आहे. अभिनेत्रीने लिहिले, “आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट खास असते. इथल्या लोकांनी आणि इथे घालवलेल्या क्षणांनी माझी पहिली मालिका आणखी खास केली आहे. हे सर्व विसरणे कठीण आहे. कारण आठवणीत ठेवण्यासारखे खूप काही आहे. मी कायम नवरी मिळे हिटलरला मालिकेची कृतज्ञ असेन”, अशी भावुक कॅप्शन देत मालिकेप्रति अभिनेत्रीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मालिकेतील लीला व रेवती या बहि‍णींच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. दोघी बहिणी कायमच कठीण काळात एकमेकींसाठी धावून आल्याचे पाहिले. विशेषत: लीलाचे रेवतीवर खूप प्रेम असल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच, रेवती व यश यांच्या लव्हस्टोरीनेदेखील लक्ष वेधून घेतले होते.

आलापिनीच्या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनीदेखील कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता रुचिरने कमेंट करीत लिहिले, “यशला त्याच्या रेवतीची नेहमीच आठवण येत राहिल”, एका नेटकऱ्याने लिहिले, “मला नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या टीमची आठवण येईल”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “आम्हाला रेवतीची आठवण येईल”, अशा कमेंट करीत नेटकऱ्यांनी कलाकारांची आठवण येईल असे लिहिले आहे.

लीला व रेवतीचा ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन बॉण्डिंग प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळाले. आता या मालिकेतून लोकप्रिय ठरलेले कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.