चार महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका बंद करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. नुकताच ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामधील एका सीनमुळे नेटकरी भडकले असून मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत. ‘पारू’ मालिकेच्या त्या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलं आहे? आणि नेटकऱ्यांचं म्हणणं काय आहे? जाणून घ्या…

काही तासांपूर्वी ‘झी मराठी’च्या सोशल मीडियाच्या पेजवर ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “पारू कुठे घेऊन गेली असेल आदित्यला…?”, असं त्याला कॅप्शन देण्यात आलं आहे. पण प्रोमोच्या सुरुवातीलाच दामिनी अहिल्यादेवीच्या अवतारात पाहायला मिळत असून ती पारूचा भाऊ गणीला काठीने बेदम मारताना दिसत आहे. आदित्य कुठे आहे?, पारूने आदित्यला किडनॅप केलं का? असं विचारत दामिनी गणीला मारहाण करताना पाहायला मिळत आहे. यावेळी दुसऱ्याबाजूला दिशाला हसताना दिसत आहे. हेच पाहून नेटकरी भडकले आहेत.

हेही वाचा – Video: रश्मिका मंदानाला ‘या’ मराठमोळ्या चिमुकलीचं लागलं वेड, ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणं गात केलेला डान्स पाहून अभिनेत्री म्हणाली…

“बाल अत्याचार दाखवू नका”, “टीआरपीसाठी आता बाल अत्याचार दाखवणार वाटतं”, “‘पारू’ मालिकेचे नाव बदलून ‘फालतुगिरी’ ठेवा जास्त शोभेल हे”, “त्या दिशाचं पात्र संपवा नाहीतर मालिकाच बंद करा”, “बकवास मालिका आहे. बंद करा”, “काहीही दाखवू नका”, “निव्वळ फालतूपणा”, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लहान मुलांना असं मारताना बघवत नाही…यांना अभिनय कसा करवतो? दुसरी वेळ आहे ही लहान मुलांना मारताना दाखविण्याची…अहिल्याचा पोषाख घालून मारते आहे ही.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खूप खूप चुकीचं दाखवलंय. ती दिशा व दामिनीला जरा आवर घाला नाहीतर मालिका बंद करा.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे,”खूप चुकीचं दाखवलं आहे…बाल हिंसाचार…लाज वाटली पाहिजे लेखकाला…इतक्या हीन पातळीवर का? तर टीआरपीसाठी?” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बाल अत्याचाराला खतपणी…मालिका बंद करा.”

हेही वाचा – Video: गेली दोन वर्षे प्रेक्षक वाट पाहत असलेला क्षण अखेर येणार, ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या महाअंतिम भागात घडणार ‘ही’ गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘पारू’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला टीआरपी देखील चांगला मिळत आहे. टॉप-२० ‘पारू’ मालिका असून गेल्या आठवड्याच्या टीआरपी यादीत १५व्या स्थानावर आहे. २.८ असा ‘पारू’ मालिकेचा रेटिंग आहे.