Nikki Tamboli on Arbaz Patel: निक्की तांबोळी नुकतीच ‘शिट्टी वाजली रे’ या स्टार प्रवाहवरील कार्यक्रमात दिसली. वेगवेगळे पदार्थ बनवण्याबरोबरच तिने प्रेक्षकांचे मनोरंजनदेखील केले. याआधी ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’मध्येदेखील सहभागी झाली होती. या शोमध्ये तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याआधी ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. या शोमध्ये ती तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचली. मात्र, संपूर्ण सीझनमध्ये निक्की तांबोळीची मोठी चर्चा झाली होती. तिची वादग्रस्त विधाने आणि तिचा खेळ यामुळे ती मोठ्या चर्चेत होती.
निक्की तांबोळी काय म्हणाली?
बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वातच अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची भेट झाली. या शोमध्ये दोघे एकाच टीममधून खेळताना दिसले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. या शोदरम्यान निक्की तांबोळी व अरबाज पटेल फक्त खेळासाठी एकत्र आल्याचे अनेकांनी म्हटले. शो संपल्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसतात. ते रिलेशनशिपमध्ये असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. आता निक्की तांबोळीने एका मुलाखतीत अरबाज पटेलबाबत वक्तव्य केले आहे.
निक्की तांबोळीने नुकतीच फिल्मीज्ञानला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजबाज पटेलबाबत ती म्हणाली की, माझ्या सगळ्यात वाईट काळात तो माझ्याबरोबर होता.
निक्की तांबोळी असेही म्हणाली की, मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला पाठिंबा देण्यासाठी कोणीही नव्हते. सध्या नेपोटिझम सुरू आहे. पालक, नातेवाईक त्यांच्या मुलांना, जवळच्या व्यक्तींना काम देत आहेत. आता जर मी त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे, तर मी अरबाजची गर्लफ्रेंड म्हणून त्याला पाठिंबा का देणार नाही? मी त्याला कायमच पाठिंबा देणार. मला वाटते की त्याने खूप प्रगती करावी, यश मिळवावे. त्याने इतके पुढे जावे की त्याला मागे वळून पाहण्याची गरज पडू नये.
याबरोबरच निक्की तांबोळी असेही म्हणाली की, हिंदी बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये अरबाजला स्पर्धक म्हणून पाहायला आवडेल. मराठी बिग बॉस संपून एक वर्ष झाले आहे. मी काही ना काही काम करत आहे. या संपूर्ण काळात त्याने मला समजून घेतले आहे. त्याने मला सांभाळले आहे. प्रत्येक परिस्थितीत मला साथ दिली आहे. पण, त्याने या वर्षभरात फार कमी काम केले आहे. त्याला काम करायचे आहे, पण तशी संधी त्याला मिळाली नाही. आता अरबाज पटेल हिंदी बिग बॉसच्या १९ व्या सीझनमध्ये दिसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.