Nivedita Saraf And Ashok Saraf Video : मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी सिनेसृष्टीतला एक काळ गाजवला आहे. सिनेमांनंतर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. यादरम्यान त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एकत्र पाहायला मिळत आहे. ‘अशोक मा.मा.’ या मालिकेनिमित्ताने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र आली आहे. अशातच दोघांचा मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ समोर आला आहे.

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी काही प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांना पहिला प्रश्न विचारण्यात आला की, ‘सगळ्यात आधी सॉरी कोण बोलतं?’ याचं उत्तर देत निवेदिता यांनी स्वत:कडे बोट केलं, तर अशोक सराफ यांनीही ‘निवेदिता’ हे उत्तर दिलं.

पुढे त्यांना ‘सर्वात जास्त विनोदी कोण आहे?’ असं विचारलं गेलं. त्यावर अशोक सराफ यांनी ‘निवेदिता’ असं उत्तर दिलं आणि निवेदिता यांनी ‘अशोक सराफ’ म्हटलं. पण, यावर अशोक सराफ यांनी मजेशीर अंदाजात म्हटलं की, “मी विनोद करतो आणि ती विनोदी आहे.” पुढे दोघांना ‘सगळ्यात जास्त शॉपिंग कोण करतं?’ असा प्रश्न विचारला गेला, ज्यावर दोघांनी सहमतीने ‘निवेदिता’ हे उत्तर दिलं. यानंतर त्यांना ‘सर्वात जास्त फोन कोण वापरतं?’ असं विचारलं, ज्यावर अशोक सराफ-निवेदिता सराफ दोघेही जोरात हसले. मग निवेदिता यांनी सांगितलं की, “मी फोनवर जास्त बोलते; पण मोबाईल वापरण्याबाबत म्हटलं तर अशोक सराफ जास्त मोबाईल वापरतात.”

पुढे दोघांना ‘सगळ्यात छान जेवण कोण बनवतं?’ असं विचारण्यात आलं, ज्यावर निवेदिता म्हणाल्या, “सहाजिकच मी… त्यांनी (अशोक सराफ) आयुष्यात चहा बनवण्याशिवाय काही केलं आहे का…” यावर अशोक सराफही होकार देत म्हणाले की, “हो… हे खरंच आहे आणि मी ते नाकारूच शकत नाही.” नंतर त्यांना ‘कोणाला खाण्याची जास्त आवड आहे?’ हे विचारलं. यावर पुन्हा अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदी शैलीत उत्तर दिलं की, “मला जेवण खाण्याची सवय आहे; पण हिला (निवेदिता सराफ) डोकं खाण्याची सवय आहे.” शेवटी दोघांना ‘घरचा गृहमंत्री कोण आहे?’ असं विचारलं गेलं. यावर निवेदिता सराफ लगेच “सहाजिकच मी आहे”, असं म्हणाल्या.

निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या प्रश्नोत्तरांचा व्हिडीओ

दरम्यान, कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रश्नोत्तरांच्या व्हिडीओला चाहत्यांनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी या जोडीचं कौतुक केलं आहे. शिवाय ‘अशोक मा. मा.’ मालिकेबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.