Nivedita Saraf Live Kitchen : ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. मराठी सिनेमा आणि मालिकांमधून गेली अनेक दशकं त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. निवेदिता यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. त्या अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर आणि कार्यक्रमांमध्ये विविध पदार्थांच्या रेसिपी शेअर करतात.
‘निवेदिता सराफ रेसिपीज’ असं त्यांच्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे. याठिकाणी अभिनेत्रीच्या चाहत्यांना चमचमीत व हेल्दी फूड रेसिपीज पाहायला मिळतात. निवेदिता सराफ ज्या मालिकांमध्ये काम करतात तेथील सहकलाकार नेहमीच त्यांच्या हातच्या जेवणाचं कौतुक करताना दिसतात. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील अभिनेता अमित रेखीने नुकतीच सेटवरच्या लाइव्ह किचनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अमितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निवेदिता सराफ शूटिंगच्या सेटवर संध्याकाळी ‘हेल्दी ओट्स डोसा विथ व्हेजिस’ हा पदार्थ बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता म्हणतो, “निवेदिता सराफ किचन… ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या आमच्या मालिकेच्या सेटवर रोज संध्याकाळी हे Live Kitchen उघडतं.. ज्यात हेल्दी रेसिपीज निवेदिता ताईंच्या हातच्या असतात आणि आम्ही सगळे त्यांना मदत करायला आणि खायला कायम तयार असतो. याला म्हणतात सेटवरचं हेल्दी वातावरण”
अमितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रतिक्षा जाधव, हरीश दुधाडे आणि अभिनेते मंगेश कदम यांनी देखील निवेदिता यांचं भरभरून कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तुम्ही सगळे खरंच खूप लकी आहात म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालीये”, “वॉव मस्तच”, “सुपर मॅम… असंच हेल्दी फूड खाण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या”, “तुम्ही सगळे किती लकी आहात यार”, “सेटवरचं वातावरण असं पाहिजे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दुपारी २:३० वाजता प्रसारित केली जाते.