Nivedita Saraf Talk’s About Her Elder Sister : निवेदिता सराफ सध्या छोट्या पडद्यावरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. अशातच त्यांनी नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ या सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बहिणीबद्दल सांगितलं आहे.
निवेदिता सराफ यांनी गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पारंपरिक अंदाजात हजेरी लावल्याचं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमधून पाहायला मिळत आहे. परंतु, त्यांच्या या लूकमध्ये एक खास गोष्ट होती, जी त्यांना त्यांच्या मोठ्या बहिणीनं भेट दिल्याचं त्यांनी मुलाखतीतून सांगितलं आहे.
निवेदिता सराफ यांना मोठ्या बहिणीने लग्नामध्ये दिलेली ‘ही’ वस्तू
‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’च्या रेड कार्पेटवर त्यांनी ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांना त्यांच्या लूकबद्दल विचारण्यात आलं होतं. निवेदिता सराफ लाल रंगाची पैठणी आणि त्यावर पारंपरिक दागिने परिधान करून आल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या सर्व दागिन्यांची खासियत सांगितली. निवेदिता म्हणाल्या, “मी आमच्या गोव्याकडील पारंपरिक दागिना पखेसुद्धा परिधान केला आहे आणि ही नथ आहे, जी मला माझ्या मोठ्या बहिणीनं माझ्या लग्नात दिली होती. या नथीला आता ३६ वर्षं झाली आहेत.”
त्यासह त्यांनी लाल रंगाच्या पैठणीवर कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध मण्यांची माळ, मंगलोरी पद्धतीचं मंगळसूत्र, तनमणी असे विविध दागिने परिधान केले होते. या सर्व दागिन्यांबद्दल त्यांनी या मुलाखतीत माहिती दिली.
निवेदिता सराफ या सध्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. त्यातील त्यांच्या शुभा या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यांच्यासह या मालिकेत अभिनेते मंगेश कदम, हरीश दुधाडे, प्रतीक्षा जाधव, पालवी कदम, अमित रेखी यांसारखे कलाकार पाहायाल मिळत आहेत.
दरम्यान, निवेदिता सराफ लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातून झळकणार आहेत. आदित्य इंगळेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अभिनेता उमेश कामत, प्रिया बापट, गिरीश ओक हे कलाकारही झळकणार आहेत. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.