आधी मालिकाविश्व गाजवून नंतर राजकारणात प्रवेश करून मंत्रीपदं भूषवणाऱ्या या अभिनेत्रीने एकेकाळी फरशी पुसण्याचं व भांडी घासण्याचं काम केलं होतं. एक ऑडिशन आणि एका ज्योतिषाने केलेल्या भाकितामुळे या अभिनेत्रीचं आयुष्य बदललं. त्या काळी महिन्याला १८०० रुपये कमावणारी ही अभिनेत्री आता टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्मृती इराणी होय.

नीलेश मिश्रा यांच्या एका पॉडकास्टमध्ये स्मृती इराणींनी आई-वडिलांच्या लग्नातील अडचणी आणि नंतर ते विभक्त झाले त्या आठवणी सांगितल्या होत्या. “खिशात फक्त १०० रुपये असताना आयुष्य जगणं, सर्वांची काळजी घेणं कठीण आहे. माझे वडील आर्मी क्लबच्या बाहेर पुस्तकं विकायचे. मी त्यांच्याबरोबर बसायचे आणि माझी आई घरोघरी जाऊन मसाले विकायची. माझे वडील जास्त शिकलेले नव्हते, तर माझी आई पदवीधर होती, त्यामुळेही त्यांच्या नात्यात अडचणी होत्या,” असं त्यांनी म्हटलं होतं.

स्मृतीचा जन्म १९७६ मध्ये दिल्लीत स्मृती मल्होत्रा ​​म्हणून झाला. तिचे वडील पंजाबी होते, तर आई बंगाली होती. ती तीन बहिणींमध्ये मोठी होती. स्मृतीला जबाबदाऱ्यांमुळे कॉलेज सोडावे लागले. ती मॅकडोनाल्डमध्ये १८०० रुपये महिना पगारावर सफाई कर्मचार म्हणून काम करू लागली. त्याआधी ती मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती आणि टॉप १० फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले होते. यासाठी तिला तिच्या कुटुंबाकडून १ लाख रुपये उसने घ्यावे लागले. स्पर्धेनंतर तिने जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला पण तशी ‘पर्सनॅलिटी’ नसल्यामुळे मुलाखतीत तिला नकार देण्यात आला.

एकता कपूर काय म्हणाली होती?

स्मृती चित्रपट व मालिकांसाठी ऑडिशन देत राहिली. स्मृती हम पांचमधील स्वीटीच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेली होती. तिथे एकता कपूरच्या आईने स्मृतीला पाहिले आणि एकताला सांगितलं की तिला मालिकेसाठी घे. एकताने स्वतः याबद्दल माहिती दिली होती. “माझ्या आईला तू खूप आवडली होतीस. ती ट्विंकल खन्नाची खूप मोठी चाहती आहे आणि तिने मला फोन करून म्हटलं, ‘ही मुलगी ट्विंकल खन्नासारखी दिसते आणि ती खूप सुंदर आहे, त्यामुळे तिला घे.’ मी तुला क्युंकि सास भी… मालिकेसाठी कास्ट केलं असं सर्वांना वाटतं, पण तसं नाही. तू माझ्या आईला आवडली होतीस,” असं एकता म्हणाली होती. नंतर एकताला स्मतीची ऑडिशन आवडली आणि तिला मालिकेसाठी फायनल केलं.

मिस इंडियामध्ये भाग घेतला कारण…

२००० मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने अवघ्या तीन महिन्यांतच टीआरपी चार्ट बाजी मारली आणि स्मृती घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेत काम करताच स्मृतीचे लग्नही झाले. त्यावेळी जवळ फार पैसे नव्हते आणि ती गृहकर्ज घेण्याचा विचार करत होती. “मी मॉडेलिंग क्षेत्रात नव्हते; माझ्याकडे फॅशनेबल होण्यासाठी साधनं नव्हती. मी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला कारण तिथे बोलण्याची संधी देखील होती. ती स्पर्धा फक्त चांगले दिसण्याबद्दल नव्हती. मला वाटलेलं की त्यांनी मला प्रश्न विचारला तर मी त्याचे उत्तर इतके चांगले देईन की मी तो स्पर्धा जिंकेन, पण मी चुकीचे होते. कारण उत्तर द्यायला तुम्ही तिथे असणं महत्त्वाचं होतं,” असं स्मृती एकदा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

स्मृती इराणींना अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता. “काहींनी मला दिसण्यावरून जज केलं, काहींनी माझ्या रंगावरून टीका केली. काही मला वजनावरून बोलायचे. यामुळे हातातून अनेक संधी गेल्या,” असं त्या म्हणाल्या होत्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’साठी एकता कपूरने नव्हे तर तिच्या आईने निवडलं होतं आणि एका ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार मुख्य भूमिका मिळाली होती, असं स्मृतींनी सांगितलं होतं.

महिन्याला १८०० कमवायचे, दिवसाला १८०० ची ऑफर

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या करारावर सही केली, तेव्हा आठवण स्मृतींनी सांगितली होती. “करारानुसार मी मालिकेत कोणाच्या तरी बहिणीची भूमिका साकारणार होते. मला माहित नव्हतं की एकता ऑफिसमध्ये आहे. एका ज्योतिषाने तिला सांगितलं की मी लोकप्रिय होईन. मग ती बाहेर आली आणि मला विचारलं की मी कशावर सही करतीये. करारानुसार मला एका दिवसाचे १२०० ते १३०० रुपये मिळणार होते. त्यावेळी मी मॅकडोनाल्डमध्ये क्लिनर होते, जिथे मला महिन्याला १८०० रुपये मिळत होते. त्यामुळे दिवसाला १२०० रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती,” असं स्मृती म्हणाल्या होत्या.

“एकताने नंतर ती कागदपत्रे फाडली आणि नवीन दिली आणि मी तुलसीची भूमिका करणार असं नमूद केलं. मला एका दिवसाचे १८०० रुपये मिळणार होते. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, कारण मी १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असे. भांडी घासून आणि फरशी पुसून महिन्याला तेवढे पैसे कमवत होते. त्या क्षणी मला वाटलं की मी लॉटरी जिंकली आहे,” असं स्मृती म्हणाल्या होत्या. स्मृतींनी तुलसीच्या भूमिकेत आठ वर्षे भारतीय टेलिव्हिजनवर राज्य केले. या शोदरम्यान त्यांचे झुबिन इराणीशी लग्न झाले आणि त्यांना दोन मुलं झाली.

स्मृती इराणींची राजकारणातील कारकीर्द

२०११ मध्ये स्मृती इराणी राजकारणात आल्या. स्मृती यांनी माहिती आणि प्रसारण, महिला आणि बालविकास आणि इतर मंत्रालयात मंत्री म्हणून काम केले. २०११ ते २०१९ पर्यंत त्या राज्यसभा खासदार राहिल्या. २०१९ ते २०२४ पर्यंत त्या अमेठी मतदारसंघातून लोकसभा खासदार राहिल्या. २०२५ मध्ये, २५ वर्षांनंतर स्मृती इराणी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’मधून भारतीय टेलिव्हिजनवर परतल्या. सध्या त्या भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. अहवालांनुसार, एकेकाळी महिन्याला १८०० रुपये कमावणाऱ्या स्मृती आता प्रत्येक एपिसोडसाठी १४ लाख रुपये मानधन घेतात.