Paaru Fame Vijay Patwardhan’s Wife Cancer Treatment Experience : विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजेच विजय पटवर्धन. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत श्रीकांत किर्लोस्कर ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

विजय पटवर्धन व त्यांच्या पत्नी वृषाली यांनी नुकतीच ‘रसिकमोहिनी’ या युट्यूब चॅनेलवर मुलाखत दिली. यावेळी वृषाली यांनी त्यांच्या आजारपणाचा कठीण काळ सांगितला. वृषाली पटवर्धन म्हणाल्या, “मला दुसऱ्या स्टेजच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. ज्यावेळी स्कॅनिंगचा रिपोर्ट आला तेव्हा फक्त ३ गाठी दिसल्या होत्या. पण, आठवड्याभराने जेव्हा माझं ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा २९ गाठी होत्या.”

वृषाली पुढे सांगतात, “डॉक्टरांनी बरणीभरून काढलेल्या त्या गाठी माझ्या दादाच्या हातात आणून दिल्या होत्या…कारण लॅबमध्ये त्या गाठींची पुढील तपासणी होणं बाकी होतं. ज्यावेळी माझं ऑपरेशन होतं त्यावेळी तो ( विजय पटवर्धन ) शूटिंगला होता. खरंतर, मीच त्याला शूटिंगला पाठवलं होतं. मी निवांत होते, फार गोष्टी मनावर घेतल्या नव्हत्या.”

“ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भूलरोग तज्ज्ञ मला भेटायला आले होते. त्यांनी मला काय-काय होईल याची माहिती दिली. कोणत्या गोळ्यांची एलर्जी वगैरे नाही ना असं सगळं विचारलं. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते, एलर्जी वगैरे काही नाहीये फक्त माझी इतकी ऑपरेशन्स झाली आहेत की, साधारण माणसाला भूल देण्यासाठी तुम्ही जर ५ एमएल औषध वापरलं जातं तर मला ते औषध १० एमएल लागेल….माझं उत्तर ऐकून डॉक्टर हसायला लागले होते.” असं त्यांनी सांगितलं.

…अन् नर्मदा परिक्रमा केली

नर्मदा परिक्रमेबद्दल सांगताना अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “ऑपरेशन झाल्यानंतर कॅन्सरवरील पुढची ट्रीटमेंट सुरू असताना मी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचं ठरवलं. मी डॉक्टरांना विचारलं होतं, त्यांचा सल्ला घेतला. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी बसने ही परिक्रमा पूर्ण करायचं असं मी ठरवलं. मी ज्या संस्थेकडून गेले होते त्यांनीही माझी खूप काळजी घेतली. जानेवारी २०२५ मध्ये मी परिक्रमा पूर्ण केली. ही यात्रा करण्यामागे अनेक कारणं होतं. माझ्या वडिलांना अचानक कॅन्सचं निदान झालं होतं, त्यात त्यांचं निधन झालं. त्यानंतर मलाही कॅन्सरचं निदान झालं. यातून आम्ही सावरलो नाही तोपर्यंत माझ्या दादालाही कॅन्सरचं निदान झालं. त्यामुळे कितीही उपचार सुरू असले तरीही मला स्वत:साठी एक वेळ हवा होता. मला एकटीलाच जायचं होतं…त्या संपूर्ण प्रवासात मी डायरी लिहायचे. घरी येऊन मी विजयला जेव्हा ते सगळं दाखवलं तेव्हा तो म्हणाला आपण याचं पुस्तक करुयात का? मग तिथून पुस्काची संकल्पना पुढे आली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वृषाली पटवर्धन यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी देखील सिनेविश्वात काम केलेलं आहे. ‘झालं मोकळं आकाश’, ‘अवंतिका’ या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. याशिवाय ‘उलाढाल’, ‘संशयकल्लोळ’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.