Paaru fame Mugdha Karnik’s advice: वाढते प्रदूषण, पाणी कमी पिणे, सकस अन्न न खाल्ल्यामुळे तसेच फास्ट फूड खाण्यावर भर दिल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. केसगळती होणे, त्वचेवर परिणाम होणे, अशाही गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकदा त्वचा कशी निरोगी ठेवावी, असा प्रश्न बऱ्याचजणांना पडलेला असतो.
अभिनेत्री काय म्हणाली?
आता पारू फेम अहिल्यादेवी म्हणजे अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी मज्जा पिंकला दिलेल्या मुलाखतीत स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य केले. मुग्धा कर्णिक म्हणाली, “स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. आपल्या शरीराची, चेहऱ्याची एकूण आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. कारण, शेवटी तुम्हाला बघायला कोणी नसतं. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतलीत, त्यात जर सातत्य ठेवलं तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो.
“आपण सतत आजारी पडतो, आपल्यात काहीतरी कमतरता असते. कारण- आपण स्वत:ची काळजी घेत नाही. आपल्याला तो त्रास होतो, इतर कोणाला तो त्रास होणार नाही. त्यामुळे स्वत:साठी थोडा वेळ काढायला काहीही हरकत नसते.”
“घरचं जेवण खाणे, हे सगळ्यात उत्तम असतं. कारण- त्यातून आपल्याला सगळी पोषणतत्वे मिळत असतात. एखाद्या दिवशी आपण बाहेरचं खाऊ शकतो. पण, इतर वेळी घरातलं जेवणं हेच सगळ्यात चांगलं औषध आहे, असं मला कायम वाटतं”, असे म्हणत अभिनेत्रीने निरोगी राहण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याबद्दल वक्तव्य केले.
अभिनेत्री सध्या पारू मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका साकारत असल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर ही यशस्वी उद्योजिका आहे. याबरोबरच एक खंबीर, संकटाना सामोरी जाणारी जबाबदारीने वागणारी अशी स्त्री आहे. त्यामुळे उद्योगजगतात तिच्या शब्दाला मान आहे.
तसेच, घरातसुद्धा तिचा दबदबा आहे. घरातील इतर सदस्य तिच्या शब्दापुढे जाण्याचे धाडस करत नाहीत. सर्वजण तिच्या शब्दाचा मान राखतात. तीसुद्धा सर्वांशी प्रेमाने वागते. मात्र, तितकीच ती कडक स्वभावाची आहे. आदित्यच्या लग्नासाठी उत्सुक असलेली अहिल्याला आता मात्र एका वेगळ्या सत्याला सामोरे जावे लागणार आहे. पारू व आदित्यचे लग्न झाल्यानंतर ती काय करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.