Paaru Fame Purva Shinde And Shrutkirti Sawant Dance Video : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या आठवड्यात ‘लक्ष्मी निवास’ व ‘पारू’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला. या महासंगम विशेष भागात लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एन्ट्री झाली होती. यादरम्यान, दोन्ही मालिकांच्या कलाकारांनी एकत्र येऊन मंगळागौर सुद्धा सादर केली. यादरम्यान, प्रेक्षकांना दोन्ही मालिकांमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले.

या विशेष भागाचं शूटिंग करताना सगळ्याच कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पण, हे सगळे कलाकार ऑफस्क्रीन धमाल देखील तेवढीच करतात. शूटिंगमधून ब्रेक मिळाल्यावर ‘पारू’ मालिकेतील दोन खलनायिकांनी एकत्र येऊन जुन्या मराठी गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘पारू’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा शिंदे ‘दिशा’ हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. तर, अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंत म्हणजेच मालिकेतील ‘दामिनी’ सुद्धा किर्लोस्करांच्या घरात नेहमी काही ना काही कुरघोड्या करताना दिसते. दिशा आणि दामिनी या दोघींनी बऱ्याचदा एकत्र मिळून पारूला त्रास दिलेला आहे. ऑफस्क्रीन सुद्धा या अभिनेत्रींची एकमेकींशी खूप छान मैत्री आहे.

पूर्वा शिंदे आणि श्रुतकीर्ती सावंत या दोघींनी मिळून “झाल्या तिन्ही सांजा…” या जुन्या सदाबहार मराठी गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. यावेळी या दोघी नऊवारी साडी नेसून, पारंपरिक लूक करून तयार झाल्या होत्या. मराठमोळ्या लूकमध्ये पूर्वा आणि श्रुतकीर्ती दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या.

“झाल्या तिन्ही सांजा…” या उषा मंगेशकर यांच्या सदाबहार गाण्यावर या दोन्ही अभिनेत्री थिरकल्या आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये पूर्वा लिहिते, “या डान्स व्हिडीओमध्ये आमच्या मागे बॅकग्राऊंडला बेटर टूगेदर ( Better Together ) असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल…आमचं नातंही अगदी तसंच आहे.” यापुढे ‘माझी सखी’ म्हणत पूर्वाने श्रुतकीर्तीला या व्हिडीओमध्ये टॅग केलं आहे.

पूर्वा आणि श्रुतकीर्ती यांच्या डान्सचं नेटकऱ्यांसह चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. “खूप सुंदर सादरीकरण”, “दिशा लयभारी”, “पूर्वा खरंच खूप छान दिसतेस”, “दोघींचा डान्स खूप कमाल” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘पारू’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका येत्या ११ ऑगस्टपासून सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाईल. नव्या मालिकेमुळे ‘पारू’, ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ अशा तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.