Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत जुनी खलनायिका दिशाची रिएन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पारितोषशी लग्न करून दिशा किर्लोस्करांच्या घरात प्रवेश करते आणि आता हळुहळू दिशाने पारूच्या विरोधात डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य दिशाला आधीपासूनच माहिती असतं. त्यामुळे सर्वात आधी दिशा मंगळसूत्रावरून आदित्यचे कान भरते. दिशाने केलेल्या खुलासा ऐकल्यावर आदित्य पारूवर चिडचिड करतो, त्याला मानसिक त्रास होतो आणि मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. यातून आदित्य लवकरच पारूशी लग्न करण्याचा निर्णय घेईल.
मात्र, दिशा एवढ्यावरच थांबत नाही. ती पारूच्या वडिलांचे म्हणजेच मारुतीचेही कान भरणार आहे. मारुतीही दिशाच्या बोलण्यात फसतो आणि यामुळेच तो एक मोठं पाऊल उचलणार आहे. पारूच्या गळ्यातील आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र मारुती काढून टाकणार आहे. लेक रात्री झोपलेली असताना मारुती गुपचूप कैचीने पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राचा धागा कापून टाकतो.
पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र जेव्हा मारुती काढतो…तेव्हा दुसरीकडे आदित्यवर संकट ओढवतं. आदित्यच्या पायावर बेडरुममधील पंखा पडतो आणि तो जोरात किंचाळतो. पारूला सुद्धा आदित्य संकटात असल्याची चाहूल लागते.
‘पारू’ मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एवढा मोठा किर्लोस्कर बंगला आणि फॅन लावला… एसी लावत नाहीत हास्यास्पद आहे”, “फॅन खाली पडला आणि आदित्यला जराही लागलं नाही”, “आम्ही आता ही मालिका बघत नाही”, “हे काय सुरूये, किती बावळटपणा आहे”, “ही मालिका कृपा करून बंद करा, काहीतरी उगाच दाखवता” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी प्रोमोच्या कमेंट्समध्ये दिल्या आहेत.


दरम्यान, ‘पारू’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज ७:३० वाजता प्रसारित केली जाते. आता प्रेक्षकांना आदित्य-पारूचं लग्न केव्हा होणार याचे वेध लागले आहेत.