Paaru Zee Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना पारू आणि आदित्यची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवीची प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या आणि आदित्यवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पारूने प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्य आणि पारूचं खोटं लग्न झालेलं असतं. पण, ‘पारू’ याच नात्याला आपलं सर्वस्व मानते.
ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर मालिकेत येणार आहे. पारूच्या नि:स्वार्थ प्रेमाची जाणीव अखेर आदित्यला होणार आहे. खोट्या लग्नाच्या आठवणी, पारूचं निस्वार्थ प्रेम आणि दिशाचे टोमणे या सगळ्या गोष्टी आदित्यच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतात. याच भावनिक गोंधळात आदित्य पारूशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेणार आहे.
आदित्य आणि पारूच्या नात्याचं सत्य मारुतीला माहिती झाल्यावर तो दोघांवर प्रचंड संतापतो. त्याचा या नात्याला पहिल्या दिवसापासून विरोध असतो. कारण, कितीही काहीही झालं तरी आपण किर्लोस्कर कुटुंबाशी बरोबरी करू शकत नाही असं मारुतीचं ठाम मत असतं. तर, आदित्यची आई अहिल्यादेवींनी सुद्धा माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाहीये, त्यामुळे घरातील मोठ्या सुनेचा मान कोणाला मिळणार हे मीच ठरवणार असा निर्णय घेतलेला असतो. या सगळ्यामुळे आदित्यची पुरती कोंडी झालेली असते आणि निश्चितच यामुळे पारूला देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार ही जाणीव आदित्यला असते. म्हणूनच तो मोठा निर्णय घेणार आहे.
आदित्य मनात विचार करतो, “बास झालं! आता काहीही झालं तरी माझ्या आणि पारूच्या नात्याला न्याय दिला पाहिजे आणि यासाठी पारूशी लग्न करणं हा एकमेव मार्ग आहे” त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना ‘पारू’ मालिकेत आदित्य-पारूचा विवाहसोहळा पाहायला मिळेल. देवीच्या उत्सवात, गुरुजी सर्वांसमोर आदित्य आणि पारूचं विधीवत लग्न लावून देणार आहेत. अहिल्या आदित्यच्या सुरक्षेसाठी एक यज्ञ पूर्ण करेल आणि त्याचक्षणी आदित्य-पारू विवाहबंधनात अडकतील.
दरम्यान, आता आदित्यने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाला अहिल्या पाठिंबा देणार का? पारू-आदित्यच्या नात्याचा स्वीकार घरातील कोणते सदस्य करणार? याचा उलगडा ‘पारू’ मालिकेच्या आगामी भागात होणार आहे. ही मालिका रोज संध्याकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते आणि १७ जुलैला ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग प्रसारित केला जाईल.