Prasad Jawade & Amruta Deshmukh Lovestory : अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांनीही आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम केलं आहे. या जोडीच्या प्रेमाची सुरुवात ‘बिग बॉस’च्या घरात झालेली. अशातच आता दोघांनी त्यांच्या हटके प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
प्रसाद जवादे सध्या ‘झी मराठी’वरील ‘पारू’ मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे, तर अमृताही तिच्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यग्र असते. अशातच दोघांनी नुकतीच ‘अनुरुप विवाह संस्था’ला एकत्र मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’च्या घरात झालेल्या प्रेमाची सुरुवात ते लिव्ह इन आणि मग लग्न हा प्रवास कसा होता याबद्दल सांगितलं आहे.
मित्राची बहीण होती म्हणून पुढाकार घेतला नव्हता – प्रसाद जवादे
मुलाखतीत प्रसाद व अमृता म्हणाले, ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच ते दोघेही एकमेकांना आवडू लागले होते, पण ‘बिग बॉस’च्या घरात त्यांना नात्याबद्दल कुठलाही निर्णय घ्यायचा नव्हता. प्रसाद याबद्दल म्हणाला, “बिग बॉसच्या घरात पहिला आठवडा मला तिला समजून घेण्यात गेला होता. त्यानंतर मला ती आवडायला लागली आणि एक वेगळा मुद्दा म्हणजे ती अभिषेकची बहीण होती आणि मी त्याच्याबरोबर नुकतंच काम केलं होतं; म्हणून मला असं वाटत होतं की मित्राची बहीण आहे, कुठे आपण या मार्गाला लागायला नको म्हणून मी फार पुढाकार घेतला नव्हता. पण, पुढे बिग बॉसच्या घरात ती मला पाठिंबा देत होती तेव्हा मला ते जाणवत होतं की काहीतरी आहे. शोमध्ये असताना मी तिला कितीवेळा विचारलं की तुझं काय म्हणणं आहे मला स्पष्टपणे सांग. ती मला म्हणायची, मी शोमध्ये तुला काहीही कमिट करणार नाही, पण ते एका अर्थाने बरं झालं.”
प्रसाद पुढे म्हणाला, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मी तिला मेसेज केला आणि मग आम्ही भेटलो. डेटवर गेलो, नंतर लिव्ह इनमध्ये राहायला लागलो आणि सुदैवाने आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं.” अमृता पुढे म्हणाली, “तेव्हा जरी मला त्याच्या काही गोष्टी आवडत नसल्या, जरी त्याचा स्वभाव मला पटत नसला तरीसुद्धा मला आतूनच त्याला भेटावसं वाटायचं की एक संधी देऊन बघूयात; पुढे जाऊयात असं वाटायचं.”
मुलाखतीत प्रसाद व अमृता यांनी सांगितलं की लिव्ह इनमध्ये राहणार हे सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लिव्ह इनमध्ये राहण्याआधी निदान साखरपुडा तरी करा असा सल्ला दिलेला. दोघांनी अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा केला पण, लग्न मात्र थाटामाटात पारंपरिक पद्धतीने केल्याचं म्हटलं आहे.
