Zee Marathi Paaru Serial Promo : ज्या क्षणाची गेली अनेक महिने प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण ‘पारू’ मालिकेत लवकरच येणार आहे. आदित्य-पारू विवाहबंधनात अडकणार आहेत. खरंतर गेल्या अनेक महिन्यांपासून पारूने तिच्या गळ्यात आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं असतं पण, ही गोष्ट कोणालाच माहिती नसते…अगदी आदित्यला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नसतं. कारण, एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान पारू-आदित्यचं खोटं लग्न झालेलं असतं. पण, ‘पारू’ खेडेगावातील मुलगी असते, त्या खोट्या-आभासी लग्नाचा तिच्या मनावर परिणाम होऊन ती नात्याचा स्वीकार करून ते मंगळसूत्र कायम जपून ठेवते.
पारूच्या गळ्यात आधीच मंगळसूत्र असल्याचं सत्य दिशा आदित्यला सांगते, ती त्याचे कान भरते. इतकंच नव्हे तर पारूच्या वडिलांना देखील ती भडकवते. यामुळे पारू रात्री झोपलेली असताना मारूती लेकीच्या गळ्यातील मंगळसूत्राचा काळा धागा कापून टाकतो. आपल्या गळ्यातील मंगळसूत्र कुठे गेलं याचा विचार करून पारूला खूप मोठा धक्का नसतो.
दुसरीकडे, आदित्यचं कायम सगळ्या संकटांपासून रक्षण करणारी मुलगी दुसरी-तिसरी कोणीही नसून पारूच आहे हे आता अहिल्यादेवीला कळून चुकलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असताना आदित्य मात्र भावनिक गोंधळात सापडलेला असतो. आता गावात देवीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि याचवेळी मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
Paaru Wedding : आदित्य-पारू करणार लग्न
‘पारू’ मालिकेत देवीच्या उत्सवात गुरुजी पारूला महत्त्वाचे संकेत देतात. “आज सूर्यास्तापूर्वी काही करून आदित्य आणि तुझं लग्न होणं गरजेचं आहे” असं ते तिला सांगतात. तर, अहिल्या आदित्यच्या रक्षणासाठी पुजेला बसलेली असते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता आदित्य आणि पारू सात फेरे घेऊन लग्नबंधनात अडकणार आहेत. यावेळी पारूचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळतं कारण, तिच्या प्रेमाचा अखेर विजय होणार आहे.
पारूच्या गळ्यात आदित्य मंगळसूत्र घालत असताना श्रीकांत किर्लोस्कर ( आदित्यचे वडील ) दुरून पाहणार आहेत. आता लेकाचं लग्न पाहून ते काय बोलणार? मालिकेत नेमकं काय घडणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहिल्या ‘पारू’चा सून म्हणून स्वीकार करेल का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना मिळतील.
दरम्यान, पारू आणि आदित्यच्या लग्नसोहळ्याचा हा विशेष भाग २३ ते २६ जुलैदरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.