Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून किर्लोस्कर कुटुंबीयांची घरी आदित्यची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता लवकरात लवकर आदित्यचा साखरपुडा करायचा असा निर्णय अहिल्याने घेतलेला असतो. पण, आदित्य साजिरीच्या हातात अंगठी घालत असताना मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

आदित्य आणि साजिरीच्या साखरपुड्याच्या मंडपात ऐनवेळी सयाजी भोसले ( सुनील बर्वे ) यांची एन्ट्री होते. ते आदित्यला साजिरीच्या हातात अंगठी घालण्यापासून रोखतात. तुझ्या मनात नेमकं काय आहे हे सत्य तू अहिल्याला सांगितलं पाहिजे. हीच योग्य वेळ आहे असा सल्ला सयाजी त्याला देतात. यानंतर बावरलेला आदित्य कसालाही विचार न करता पारूचा हात धरतो आणि दोघंही अहिल्यासमोर उभे राहतात.

ज्या क्षणाची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत होते अखेर तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे. आदित्य आणि पारूच्या प्रेमाचं सत्य अखेर अहिल्यादेवीसमोर उघड होणार आहे. स्वत: आदित्य आपल्या आईसमोर पारूवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

आदित्य म्हणतो, “आई माझं पारूवर प्रेम आहे…आमचं लग्न झालंय.” पारू गेली कित्येक महिने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालत असते. ते सुद्धा ती अहिल्याला दाखवते. या सगळ्या गोष्टी पाहून अहिल्या प्रचंड संतापते.

अहिल्या संतापून म्हणते, “आदित्य…! या अहिल्यादेवीच्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरीही नाही.” अहिल्याच्या रौद्ररुपाचा सामना आता पारू आणि आदित्यला करावा लागणार आहे.

अहिल्याने घराबाहेर काढल्यावर आदित्य आणि पारू कुठे राहणार? त्यांच्या प्रेमाची ताकद अहिल्याचं मन जिंकून घेईल का? याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होईल. आदित्य-पारूच्या प्रेमाचं महासत्य उघड झाल्याचे हे विशेष भाग १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर यादरम्यान प्रेक्षकांना सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहेत. नेटकरी सुद्धा हा प्रोमो पाहून खूश झाले आहेत. ज्या क्षणाची इतके दिवस सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट अखेर पारू मालिकेत घडली असून, आता पुढे काय घडणार याची आतुरता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.