Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत लवकरच प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेतील दिशा, दामिनी या पात्रांमुळे पारूची प्रतिमा कमी शिकलेली, अडाणी अशी तयार झालेली असते. पण, पारूमध्ये पहिल्यापासून शिक्षणाची आवड असते, घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलेलं नसतं.

‘पारू’ दिसायला खूपच सुंदर असते, आदित्य सुद्धा सर्वप्रथम तिच्या डोळ्यांच्या प्रेमात पडलेला असतो. त्यामुळे साधीभोळी पारू किर्लोस्करांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते. आता तिच्यासमोर एक नवीन आव्हान निर्माण झालं आहे, यातून ‘पारू’ कशा पद्धतीने मार्ग काढणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

किर्लोस्करांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याने ‘पारू’ला एका मोठ्या स्पर्धेत सहभागी व्हावं लागणार असतं. मात्र, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य मुली खूपच आत्मविश्वासू असतात, त्यांना इंग्रजी बोलता येत असतं यासह त्या मॉडर्न देखील असतात. त्यामुळे या स्पर्धेत पारूचा निभाव कसा लागणार याची चिंता अहिल्यादेवींना सतावत असते. अखेर आदित्यच्या मदतीमुळे पारू या सगळ्यातून मार्ग काढून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज होणार आहे.

मालिकेच्या आगामी भागात ‘पारू’ प्रेक्षकांना पहिल्यांदाच इंग्रजी बोलताना दिसेल. तिचं इंग्रजी बोलणं ऐकून सगळेच अवाक होतात. दामिनी आणि दिशाच्या चेहऱ्यावर तर बारा वाजलेले असतात. पारूमध्ये इंग्लिश बोलताना आत्मविश्वासाचा अभाव असतो पण, तरीही ती न डगमगता “I live In amrapur taluka wada district palghar” अशी माहिती पत्रकारांना देत असल्याचं मालिकेच्या आगामी प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. यावेळी दामिनी दिशाला, “हिला इंग्रजी कसं जमतंय?” असा प्रश्न विचारते. यावर दिशा म्हणते, “नीट कुठे जमतंय अडाणी…”

आता पारूने इंग्रजीतून संवाद साधण्याचा टप्पा पार केल्यावर तिच्यासमोर येणारं पुढचं आव्हान मॉडर्न कपडे परिधान करण्याचं असणार आहे. आता या स्पर्धेत पारू कशी बाजी मारणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

‘पारू’ मालिकेच्या वेळेत बदल

‘पारू’ मालिका ११ ऑगस्टपासून सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर, ७:३० ला तेजश्री प्रधानची नवीन मालिका ऑन एअर होईल. नव्या मालिकेमुळे वाहिनीवरील ‘पारू’, ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ अशा तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.