Paaru Upcoming Twist: ‘पारू’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आदित्यच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करने तिच्या मोठ्या मुलासाठी म्हणजेच आदित्यसाठी साजिरीची निवड केली आहे. त्याच्या लग्नासाठी अहिल्यादेवी उत्साही आहे.
पारू किर्लोस्करांची सून म्हणून घरात येऊ नये म्हणून दिशा व दामिनीदेखील साजिरी व आदित्यचे लग्न व्हावे, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, पारू व आदित्यचे याआधीच लग्न झाले आहे. याबद्दल पारू व आदित्यसह प्रिया, प्रीतम, श्रीकांत यांना माहीत आहे. आता याबद्दल प्रियाचे वडील व अहिल्यादेवीचा भाऊ सयाजी यांना माहीत आहे.
‘पारू’ मालिकेत पुढे काय घडणार?
सयाजीच अहिल्यादेवीला सत्य सांगणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. सयाजी अहिल्याला म्हणतो, “अहिल्या, त्याने तुला खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या सुनेबद्दलच्या अपेक्षा ऐकून तो आजवर तुझ्याशी काहीही बोलू शकला नाही.”
त्यावर अहिल्या म्हणते की, “बरं ठीक आहे, कोण आहे कोण ही मुलगी?” त्यावर सयाजी म्हणतो की, “आपल्या आदित्यचं पारूवर प्रेम आहे.” पुढे तो असेही म्हणतो की, “मुलांनी विरोधात जाण्याआधी तू सावध हो. हवं तर आदित्य व पारूशी त्यांच्या नात्याबद्दल बोल”, सयाजीकडून आदित्यबद्दल ऐकल्यानंतर अहिल्यादेवीच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अखेर अहिल्याला आदित्य आणि पारूच्या प्रेमाबद्दल कळणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “नशीब खूप लवकर समजल”, “कमीतकमी कोणीतरी सांगितलं”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी पारू व आदित्यने लग्नगाठ बांधली. श्रीकांतला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा त्याला धक्का बसला. पण, पारू व आदित्यने परिस्थितीमुळे कोणाला सांगता आले नाही आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले. त्यानंतर श्रीकांतने त्यांना समजून घेतले. अहिल्याला त्यांच्या लग्नाबद्दल सांगण्याचा सल्ला दिला, पण अहिल्याच्या भीतीपोटी त्यांनी सांगितले नाही. तसेच जेव्हा साजिरीबरोबर आदित्यचे लग्न ठरले, तेव्हा आदित्यने सांगण्याचे ठरवले, पण पारूने त्याला विरोध केला.
आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.