Pankaj Dheer Daughter In Lew Emotional Post : ऑक्टोबर महिन्यात कलाविश्वातील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे गेल्या काही दिवसांत निधन झाले आहे. लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांनीसुद्धा १५ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंकज धीर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या निधनानंतर एक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पंकज धीर यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनेला आपले वडील गमावल्यासारखं वाटत आहे. याच भावना तिनं व्यक्त केल्या आहेत. पंकज धीर यांच्या निधनाच्या १५ दिवसांनी सून कृतिका सेंगर धीरनं सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सासरे पंकज धीर यांच्याबरोबरचा फोटो शेअर करीत तिने अपल्या दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टद्वारे क्रतिका म्हणते, “तुम्हाला ‘सासरचे’ हा शब्द कधीच आवडला नाही. तुम्ही नेहमी म्हणायचात, ‘ती माझी मुलगी आहे’ आणि तुम्ही मला अगदी तसंच वागवलंत. तुमच्या डोळ्यांतल्या भावनेनं तुम्ही नेहमी विचारायचात की, “या जगातली सगळ्यात चांगली मुलगी कोण?” आणि मी हसत हसत म्हणायचे, “मी…”
मी तुम्हाला ‘आय लव्ह यू डॅड’ असं म्हणायला नेहमीच लाजायचे, पण मी सहजपणे आय लव्ह यू म्हणेन इतका सहजपणा तुम्ही आपल्यात निर्माण केला होता. हीच तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती. तुम्ही फक्त माझे सासरे नव्हता, तर तुम्ही माझे वडील होता, माझे मित्र होतात. आपण तासन्तास बोलायचो, आपल्यात असं काही खास बोलणं व्हायचं नाही; पण तरी आपण सगळं काही शेअर करत होतो. पण, आता तुम्ही गेल्यानंतर ही शांतता त्रासदायक वाटत आहे.”
पंकज धीर याच्या सूनेची भावुक पोस्ट
यानंतर ती सांगते, “देविकेवर तुम्ही जसं प्रेम केलंत त्याबद्दल धन्यवाद. तिच्या मनात तुम्ही नेहमी Bestest Daadu म्हणून जिवंत राहाल. आय लव्ह यू, डॅड.” कृतिकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सद्वारे पंकज धीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, पंकज धीर हे त्यांच्या महाभारतातील कर्ण या भूमिकेसाठी ओळखले जातात. १५ ऑक्टोबर रोजी, वयाच्या ६८व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होते.
