Parth Samthaan : टेलिव्हिजनवर २० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सीआयडी’. १९९८ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. यानंतर २०१८ मध्ये ही मालिका बंद करण्यात आली होती. पण, चाहत्यांच्या मागणीमुळे या मालिकेचा नवा सीझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नवीन सीझनलादेखील प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच काही दिवसांपुर्वी मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची एक्झिट झाल्याचे दाखवण्यात आलं.

‘सीआयडी’मधील एंट्रीनंतरच्या ट्रोलिंगबद्दल पार्थ समथानची प्रतिक्रिया

मालिकेत बॉम्बस्फोटात एसीपी प्रद्युम्न यांचा जीव जाणार असल्याचे काही वृत्तांमधून समोर आले. त्यांच्याऐवजी पार्थ समथानने नवीन एसीपी म्हणून मालिकेमध्ये प्रवेश केला. एसीपी प्रदयूम्न यांच्या ऐवजी पार्थ समथान आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच पार्थ समथानलाही यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच ट्रोलिंगबद्दल त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवाजी साटम यांच्या भूमिकेचं कौतुक करत पार्थने स्पष्ट केले की, तो केवळ या मालिकेमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे.

“खरं सांगायचं तर इतकी ट्रोलिंग होईल अशी मला अपेक्षा नव्हती”

इंडिया फोरम्सशी साधलेल्या संवादात पार्थ समथानने असं म्हटलं की, “खरं सांगायचं तर, इतकी ट्रोलिंग होईल अशी मला अपेक्षा नव्हती. पण हे नेमकं कशामुळे झालं ते मी समजू शकतो. शिवाजी साटम सरांचा आणि त्यांच्या अनेक पात्रांचा मीदेखील एक मोठा चाहता आहे. जर मी प्रेक्षकांच्या जागी असतो आणि त्यांच्या आवडत्या भूमिकेत कोणीतरी नवीन येतानाचे पाहून मलाही वाईट वाटलं असतं. मी ‘सीआयडी’ मालिकेमध्ये एका उद्देशाने आलो आहे आणि तो उद्देश लवकरच कथेतून उघड होईल.”

“एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारणे ही खूप मोठी जबाबदारी”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “सध्या आयुष्मानचे इतर अधिकाऱ्यांशी कोणतेही नाते नाही आणि त्यांच्यातील तो तणाव कायम राहील. एखाद्या दिग्गज कलाकाराची जागा घेणे कधीच सोपे नसते. मी त्यांची जागा घेण्यासाठी नाही तर त्यांच्या वारशाचा आदर करत प्रेक्षकांसमोर काहीतरी नवीन घेऊन येण्यासाठी आलो आहे. एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारणे ही खरोखर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण मी एसीपी आयुष्मान म्हणून त्यांची जागा घेत आहे.”

“मी कधीही विचार केला नव्हता की, मी या मालिकेचा भाग होईन”

यानंतर पार्थने कुटुंबियांच्या प्रतिकक्रियेबद्दल असं म्हटलं की, “जेव्हा मी माझ्या कुटुंबाशी याबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांना वाटले की, मी मस्करी करत आहे. पण जेव्हा मी त्यांना याबद्दल गांभीर्याने सांगितलं, तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटला. हे एक नवीन पात्र आहे, एक नवीन कथा आहे. मी कधीही विचार केला नव्हता की, मी या मालिकेचा भाग होईन. त्यामुळे मला आनंद आहे.” दरम्यान, पार्थने काही दिवसांपुर्वी शिवाजी साटम यांच्याबरोबरची एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी साटम यांच्याबरोबर काम करतानाचा व्हिडीओ केलेला शेअर

पार्थ समथानने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो शिवाजी साटम यांची भेट घेताना दिसला. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं असल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं होतं. या व्हिडीओसह त्याने “एसीपी प्रद्युम्न उर्फ ​​शिवाजी साटम यांच्याबरोबर शूटिंग करताना खूप आनंद झाला आणि मनोरंजनही झाले. खूपच भारी माणूस.” असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवाजी साटम पुन्हा ‘सीआयडी’मध्ये येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.